Take a fresh look at your lifestyle.

चर्चची ती सामुदायिक प्रार्थना फ्रान्ससाठी ठरली ‘कोरोना बॉम्ब’

पॅरिस : फ्रान्समध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४० हजारांपेक्षा जास्त झाली आहे. देशात इतक्या वेगाने कोरोनाची साथ कशी पसरली याचा शोध घेणे सुरू झाले आहे. आतापर्यंतच्या निरीक्षणात असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे की, फ्रान्समधील एका चर्चमधील सामुदायिक प्रार्थना याला कारणीभूत असावी.हे कारण फ्रांस सरकारच्या लक्षात येईपर्यंत या चर्चमध्ये आलेले भक्त युरोपशिवाय आफ्रिका, लॅटिन अमेरिकेतील देशांमध्ये परतले होते!

या चर्चचा धार्मिक महोत्सव आठवडाभर सुरू असतो. फ्रान्समधील म्यूलहाऊसमध्ये हजारो लोक या महोत्सवात सहभागी झाले होते. १८ फेब्रुवारीला सुपरचर्च ख्रिश्चन ओपन डोर मास (सामुदायिक प्रार्थना) झाली. म्यूलहाऊसची सीमा जर्मनी आणि स्वित्झर्लंड या देशांशी जोडली गेली आहे. या महोत्सवात सहभागी झालेल्या कुणालातरी कोरोनाची लागण झाली असणार. त्याच्या संसर्गातून फ्रान्स आणि युरोपीयन देशांमध्ये ही साथ पसरल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, चर्चमधील ही सामुदायिक प्रार्थना फ्रान्समधील कोरोना संसर्गाच्या प्रसाराचे केंद्र ठरले. कोरोनाचे सुमारे २५०० रुग्ण या चर्चमध्ये येऊन गेले असावेत असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. प्रार्थनेसाठी हे भक्त स्वित्झर्लंड, पश्चिम आफ्रिकेतील देश बुर्किना फासो, कोरेसिका, लॅटिन अमेरिकेतील गयाना आदी देशातील होते. काही आठवड्यानंतर जर्मनीने फ्रान्सची सीमा अंशत: सील होती. सीमा सील करण्यामागे हा चर्च मोठे कारण असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी ‘राउटर्स’ या वृत्तसंस्थेला दिली. या प्रार्थना सभेत उपस्थित असणाऱ्या १७ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला असल्याचे उघड झाले आहे.

ज्यावेळी ही प्रार्थना सभा झाली त्यावेळी फ्रान्समध्ये कोरोनाबाबत काहीही खबरदारी घेण्यात येत नव्हती. हात न मिळवणे, हात धुणे यांसारखे निर्देशही जारी करण्यात आले नव्हते. कोविड-१९ आमच्यापासून खूप दूर आहे, त्यादृष्टीने आम्ही संसर्गाकडे पाहत असल्याचे चर्च संस्थापक के. जोनाथन यांनी सांगितले. आता जोनाथन यांच्या वडिलांनाही करोनाची लागण झाली आहे.

चर्चशी संबधित पहिला रुग्ण २९ फेब्रुवारी रोजी आढळला. त्यानंतर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वच नागरिकांची चौकशी केली. चर्चनेही त्या प्रार्थनेत आलेल्यांची यादी दिली. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केला तेव्हा खूप उशीर झाला असल्याची जाणीव झाली.

कोरोनाची सर्वाधिक बाधा झालेला फ्रान्स हा युरोपातील चौथा आहे. कोरोनासाजे ४० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. २६०० हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ‘लॉकडाऊन’ जाहीर केला आहे. लॉकडाऊनचा आदेश न पाळणाऱ्यांविरोधात शिक्षा जाहीर करण्यात आली आहे.