Take a fresh look at your lifestyle.

रामायणातील निषाद राज यांना देवाज्ञा; मालिकेतील सीतेने व्यक्त केला शोक

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मालिका जगतातील अत्यंत लोकप्रिय आणि लोकांच्या आठवणीत राहिलेली मालिका म्हणजे रामानंद यांचे ‘रामायण’. हि एक अशी अध्यात्मिक मालिका होती जी एकेकाळी प्रत्येक घराघरात न चुकता पहिली गेली आहे. याशिवाय या मालिकेतील प्रत्येक पात्र साकारणारा कलाकार आजही मनात जिवंत आहे. विशेष म्हणजे हि मालिका लॉकडाऊन दरम्यान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मागणीमुळे प्रसारित केली होती. ज्याचा टीआरपी सर्वांना आश्चर्यचकित करणारा होता.

अश्यात आता एक दुःखद बातमी समोर येत आहे. ‘रामायण’मध्ये निषाद राज हि अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारणारे अभिनेते चंद्रकांत पंड्या यांचे निधन झाले आहे. दरम्यान ते ७२ वर्षांचे होते. या वृत्ताला रामायणात सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी दुजोरा दिला आहे. दीपिका चिखलिया यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर चंद्रकांत पंड्या यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.

चंद्रकांत पंड्या यांचा एक फोटो शेअर करत अभिनेत्री दीपिका चिखलीया यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘तुमच्या आत्म्याला शांती लाभो चंद्रकांत पंड्या, रामायणातील निषाद राज’. त्याचबरोबर रामायणात रामची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनीही चंद्रकांत पंड्या यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले कि, मालिकेत चंद्रकांत पंड्या यांनी साकारलेली निषाद राज ही भूमिका आमच्या आणि प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहणार आहे.

गुजरात राज्यातील बनासकांठा या जिल्ह्यातील भिल्डी गावात राहणारे चंद्रकांत पंड्या यांचा जन्म १ जानेवारी १९४६ रोजी एका व्यापारी कुटुंबात झाला. चंद्रकांत पंड्या यांनी अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांत काम केले होते. रामायणात त्यांनी निषाद राजची भूमिका साकारली होती. या भुमिकेने त्यांना वेगळीच ओळख मिळाली. चंद्रकांत पंड्या यांनी १०० हून अधिक हिंदी आणि गुजराती भाषिक चित्रपट तसेच मालिकांमध्ये काम केले होते. यात विक्रम बेताल, संपूर्ण महाभारत, होते होते प्यार हो गया, तेजा, माहियार की चुडी, सेठ जगदंशा या मालिकांचा समावेश आहे.