हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या मराठी चित्रपट राष्ट्रीय सोबत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत देखील आपापली विशेष छाप उमटवत आहेत. आतापर्यंत अनेक चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय पातळी गाजविली. आता या यादीत ‘पगल्या’ या चित्रपटाचादेखील समावेश झाला आहे. लॉकडाऊनमुळे प्रदर्शित होऊ न शकलेला मराठी चित्रपट पगल्याने मॉस्को फिल्म फेस्टिव्हल मध्ये बाजी मारली आहे. मॉस्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२१ मध्ये ‘पगल्या’ चित्रपट सर्वोत्तम परदेशी भाषा कॅटेगरीमध्ये अव्वल ठरला आहे. ‘पगल्या’ ने मॉस्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बेस्ट फॉरेन फीचर अवॉर्ड’ पटकावला आहे. एका शॉर्ट फिल्मसाठी डॉ. सुनील खराडे यांनी ही पटकथा लिहिली होती. मात्र, कथा लिहिल्यानंतर त्यांना या कथेवर चांगला चित्रपट होऊ शकतो असे वाटले.
लहान मुलांच्या लहानश्या विश्वात पाळीव प्राण्यांचे असणारे स्थान आणि प्राण्यांबद्दल असणाऱया त्यांच्या निरागस भावना या चित्रपटात मांडण्याचा सालस प्रयत्न केला आहे. ‘पगल्या’ ही ऋषभ आणि दत्ता या दोन मुलांची कथा आहे. दहा वर्षांचे दोन चिमुकले मित्र आणि त्यांचा छोटा कुत्रा यांच्याभोवताली फिरणारी या चित्रपटाची भावुक कहाणी आहे. एक शहरातील तर एक खेड्यातील असे हे मित्र. एका मित्राचे हरवलेले कुत्र्याचे पिल्लू दुसऱ्याला सापडते आणि ते कसे मित्र बनत गेले, ही साधी, सरळ पण प्रत्येकाला आपली वाटणारी अशी ही कहाणी आहे.
विनोद सॅम पीटर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाबाबत निर्माते-दिग्दर्शक विनोद सॅम पीटर म्हणाले, ‘या मराठी चित्रपटाच्या कथेला इतका मोठा पुरस्कार मिळाल्याचे पाहून खूप आनंद होत आहे. तसेच मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जिंकणे माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी खूपच अभिमानास्पद आहे.’ हा चित्रपट इटली, अमेरिका, यूके आणि स्वीडन या देशातील १९ चित्रपट महोत्सवात याची निवड झाली आहे. या चित्रपटाला कॅलिफोर्नियातील लॉस वर्ल्ड प्रीमियरमध्येही गौरवण्यात आले आहे. याशिवाय लंडन, इटली, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, फिलिपाईन्स, तुर्की, इराण, अर्जेंटिना, लेबनन, बेलारुस, रशिया, कझाकिस्तान, इज्रायल, अमेरिका आणि कॅनडामध्ये विविध फिल्म फेस्टिव्हल्समध्ये सन्मान मिळवले आहेत.
Discussion about this post