हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल मराठी चित्रपटांची दखल सात समुद्रापार पर्यंत घेतली जाते. उत्त कथानक आणि दर्जेदार अभिनयाची सांगड घालणारे अनेक चित्रपट आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुकाची थाप मिळविण्यात यशस्वी झाले झाले आहेत. मात्र तरीही ह्यातील काही चित्रपट अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले असूनही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळविण्यात अयशस्वी ठरतात. त्यातील निवडक चित्रपटच बॉक्स ऑफिसवर छाप सोडतात. खरेतर यासाठी प्रेक्षकांना दोष देणे चुकीचे आहे. कारण आपला प्रेक्षक सुजाण आणि सज्ञान आहे. परंतु प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहोचवणारी मधली फळीच मराठी चित्रपटांना घातक असल्याची खंत दिग्दर्शक भीमराव मुडे यांनी व्यक्त केली आहे.
भीमराव मुडे ह्यांचा या कलाक्षेत्रातील प्रवास एम. डी. नाट्यांगणातून झाला असून, पुढे बापमाणूस, लक्ष्य, जगणे आपले, अग्निहोत्र, रुद्रम, काळूबाईच्या नावाने चांगभलं या लोकप्रिय मालिकांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘बार्डो’ या चित्रपटाला नुकताच सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. यानिमित्त झालेल्या मुलाखतीत त्यांनी मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱया सिस्टीमबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, मधली फळी मराठी चित्रपटांचा घात करतेय. चित्रपट चालत नसल्याचे कारण देत एका आठवडय़ात शो उतरवले जातात. कारण पुढच्या आठवडय़ात त्यांना नवीन चित्रपट घ्यायचा असतो. दुसरीकडे थिएटरवाल्यांची वेगळी आर्थिक गणितं असतात. बॉलीवूड, हॉलीवूड चित्रपटांच्या प्रेक्षकांकडून पॉपकॉर्न आणि पार्किंगच्या माध्यमातून बक्कळ कमाई होते. त्यामुळे या चित्रपटांना प्राइम टाइमला तर मराठी चित्रपटांना भलत्याच वेळी शो दिले जातात. मधल्या फळीचे हे ‘डावपेच’ कुठेतरी थांबले पाहिजेत, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
तसेच एकांकिका स्पर्धा आल्या, की नाटय़ महामंडळातील मुलं तासनतास लायब्ररीत दिसतात. कोणत्या नाटकावरून किंवा साहित्यावरून एकांकिका करायची याचा विचार करतात. एखादं साहित्य मोठं करणं ही चांगलीच गोष्ट आहे. परंतु वारंवार कॉपी-पेस्ट करण्यात काहीच अर्थ नाही. त्यापेक्षा स्वतःच्या क्रिएटीव्हिटीवर विश्वास ठेवा. नवीन विषय बिनधास्तपणे मांडा, असा कानमंत्र त्यांनी उदयोन्मुख कलाकारांना दिला आहे. स्वप्न सत्यात उतरले पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करताना ते म्हणाले, ‘आपल्या कलाकृतीला पुरस्कार मिळावा हे कथा लिहिताना माझे स्वप्न होते. पटकथा लिहिताना डॉ. श्वेता पेंडसे यांचे स्वप्न त्यात मिसळले गेले. त्यानंतर गायक, कलाकार, संगीतकार आदींची स्वप्नं त्यात मिसळली गेली अन् आपल्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळावा हे मोठं स्वप्न तयार झालं. ‘बार्डो’मुळे ही स्वप्नांची मालिका पूर्ण झाली. प्रत्येक स्वप्न हे दुसऱयांच्या स्वप्नाशी निगडित आहे. अशी बार्डोतून मांडलेली ‘थिअरी ऑफ ड्रीम रिलेटीव्हिटी’ वास्तवात पूर्ण झालेली दिसली.
Discussion about this post