हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। किशोर नांदलस्कर हे मराठी सिनेसृष्टीप्रमाणेच हिंदी सिनेसृष्टीत देखील गाजलेले नाव आहे. आपल्या अभिनयाने इतरांहून वेगळी अशी ओळख निर्माण करणारे, ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे आज दुपारी १२.३० च्या सुमारास ठाणे येथे कोरोनाने निधन झाले. किशोर नांदलस्कर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तात्काळ ठाण्यातील बाळकुम परिसरात असणाऱ्या ग्लोबल कोविड सेंटरमध्ये त्यांना दाखल केले होते. पण अखेर कोरोनाशी लढता लढता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी मिळताच मराठी सिनेसृष्टीवर जणू दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
किशोर नांदलस्कर यांनी आत्तापर्यंत सुमारे ४० नाटकांमध्ये विविध भूमिका आकारल्या आहेत. २५ हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्येदेखील त्यांनी काम केले आहे. तर २० हून अधिक मालिकांमधून त्यांनी छोटा पडदा देखील गाजवला आहे. ‘सारे सज्जन’, ‘शेजारी शेजारी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’, शेम टू शेम, बाळाचे बाप ब्रह्मचारी, वाजवा रे वाजवा अशा अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या. ‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘वन रूम किचन’ आदी नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांना अगदी पोट दुखेपर्यंत हसवलं.
महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘तेरा मेरा साथ है’, ‘खाकी’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’, प्राण जाए पर शान न जाए या हिंदी चित्रपटांतीलही त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. ‘जिस देस मे गंगा रहता है’ या चित्रपटातील त्यांनी साकारलेली ‘सन्नाटा’ची विनोदी भूमिका प्रेक्षकांना अत्यंत भावली होती. असा हा प्रेक्षकांना भावलेला सन्नाटा असा अचानक सोडून जाईल असे कुणाच्या ध्यानी मनी देखील नव्हते. मराठी तसेच बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत.
Discussion about this post