हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका गेल्या अनेक आठवड्यांपासून रंजक वळणावर आहेत. आई कुठे काय करते, रंग माझा वेगळा, स्वाभिमान यासारख्या बहुतांश मालिका लोकप्रिय असून त्यातील कथानक रंजक आहे. यामुळे पुढे काय होणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनात कुठलाही व्यत्यय येऊ नये, याची काळजी स्टार प्रवाह वाहिनीकडून घेतली जाणार आहे.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचं चित्रीकरण गोव्यात होणार आहे. तर ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेची टीम चित्रीकरणासाठी गोव्यात स्थंलांतरीत होणार आहे. तसेच ‘आई कुठे काय करते’, ‘स्वाभिमान’, ‘सहकुटुंब सहपरिवार’, ‘मुलगी झाली हो’, ‘सांग तू आहेस का’ या मालिकांचे चित्रीकरण सिल्वासा येथे करण्यात येणार आहे. तर ‘फुलाला सुंगध मातीचा’ या मालिकेची टीम गुजरातला रवाना झाली असून याचे चित्रीकरण अहमदाबाद येथे सुरु करण्यात आले आहे.
कोविडसंदर्भातील सगळ्या नियमांचे पालन करून या मालिकांचे चित्रीकरण करण्यात येत आहे. ज्या ज्या राज्यांमध्ये चित्रीकरणाची परवानगी आहे आणि जिथे चित्रीकरण होऊ शकतील अशाच ठिकाणी चित्रीकरण करण्यात येत आहे. नियमानुसार सगळ्या कलाकारांच्या कोविड टेस्ट करण्यात आली असून महाराष्ट्राबाहेर नेले जात आहे.
गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात मनोरंजन विश्वाला मोठा फटका बसला होता. मालिका तसेच चित्रपटांचे चित्रिकरण मार्च ते जुलै बंद होते. त्यामुळे प्रेक्षकांना जुन्या भागांचा आस्वाद घ्यावा लागत होता. यासाठी दरम्यानच्या काळात अनेक निर्मात्यांनी एपिसोड्सची बँक तयार करुन ठेवली होती. सध्या महाराष्ट्रातील चित्रिकरण थांबताच बहुतांश हिंदी मालिकांनी आपलं बस्तान राज्याबाहेर हलवलं आहे. मराठी मालिकांसाठी हा पर्याय खर्चिक असला, तरी अखंड मनोरंजनाची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी अनेक वाहिन्यांनी हा निर्णय घेतला आहे.
Discussion about this post