हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांनी चेंबूरमधील आर. के. हाऊस हे वडिलोपार्जित घर विकण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या घरात त्यांचे बालपण गेले, ज्या घरात त्यांच्या कित्येक आठवणी आहेत तेच घर आज एकटेपणामूळे त्यांना नकोसे वाटू लागले आहे. आता वडिलोपार्जित घर विकून वांद्रे येथे आपल्या कुटुंबियांजवळ शिफ्ट होण्याचा त्यांनी पक्का निर्णय घेतला आहेत. काही दिवसांपूर्वी रणधीर यांनी आपल्या दिवंगत भावंडांचा फोटो शेअर केला होता. सोबत भावुक होत त्यांची आठवण येत असल्याचे त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले होते. ऋषी आणि राजीव यांच्या निधनानंतर एकटेपण वाटत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.
रणधीर कपूर म्हणाले, ”राजीव बहुतेक वेळा माझ्याबरोबरच राहत असे. त्याचे पुण्यात एक घर होते. मात्र तो बरेच दिवस मुंबईत राहत होता. राजीवच्या निधनानंतर मला एकटेपणा जाणवत होता. म्हणून मला वाटलं की, आता मी माझ्या कुटुंबाच्या जवळ राहायला हवे.” वडिलोपार्जित घराविषयी बोलताना ते म्हणाले, ”माझ्या आई-वडिलांनी मला सांगितले होते की, मी या घरात मला जेवढे वाटेल तेवढे दिवस राहू शकतो. मात्र ज्या दिवशी मी हे घर विकेन, तेव्हा त्यातून मिळणारे पैसे मला ऋषी, राजीव, रितू आणि रीमा यांना वाटून घ्यावे लागतील.”
रणधीर कपूर यांनी आधीच वांद्रे येथे माऊंट मेरी चर्चजवळ घर विकत घेतले आहे. त्यांचे हे नवीन घर पत्नी बबिता आणि दोन्ही मुली करिष्मा व करीना यांच्या घराजवळ आहे. दरम्यान, रणधीर कपूर यांना नुकतीच कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांच्यावर अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रणधीर यांच्या तब्येतीकडे पाहता त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, ‘माझ्या काही चाचण्या करायच्या असल्यामुळे मला आयसीयू वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे. रुग्णालयात सर्वजण माझी काळजी घेत आहेत. डॉक्टर नेहमी माझ्या आजूबाजूला असतात.’
Discussion about this post