हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मल्याळम भाषिक चित्रपट ‘दृष्यम २’ सुपरहिट झाल्यानंतर सर्वजण त्याच्या हिंदी रिमेकच्या प्रतीक्षेत होते. अश्यात दृश्यम २ रुपेरी पडद्यावर येणार असल्याची घोषणा निर्माते कुमार मंगत यांनी केली आहे. यामुळे अजय देवगण ‘दृश्यम २’च्या निमित्ताने पुन्हा मोठ्या पडद्यावर कधी पाहायला मिळेल, याची वाट त्याचे चाहते आतुरतेने पाहू लागले आहेत. चित्रपटाचे हिंदी हक्क विकत घेतल्यानंतर या चित्रपटाची घोषणा निर्मात्यांद्वारे मंगळवारी करण्यात आली आहे. मात्र या चित्रपटाच्या हिंदी रिमेकच्या घोषणेमुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. दृश्यम २ च्या निर्मितीसाठी वायकॉम १८ ला बाजूला सारल्यामुळे वायकॉम १८ कडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘दृश्यम २’ या चित्रपटाचे हिंदी भाषेचे हक्क पॅनोरामा स्टुडिओ आणि कुमार मंगत यांनी एकत्र खरेदी केले आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दृष्यमचा पहिला भाग पॅनोरामा आणि कुमार मंगत यांच्यासह ‘व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्स’ने तयार केला होता. मात्र ‘दृश्यम २’ च्यावेळी ‘व्हायकॉम १८’ला बाजूला सारल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या चित्रपटावर आपलाही हक्क असल्याचे ‘व्हायकॉम १८’ने म्हटले आहे. सूत्रानुसार, ‘व्हायकॉम १८’ने कुमार मंगत यांना सांगितले आहे की, आपण अशा प्रकारे आम्हाला या प्रकल्पातून वेगळे करू शकत नाही.
इतकेच नव्हे तर वायकॉम १८ यांचे असेही म्हणणे आहे कि, दृश्यम २ ते इतर कोणासोबतही एकत्र बनवू शकत नाही. कुमार मंगत हे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करणार होतेच की, ‘व्हायकॉम १८’ने त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची पहिली सुनावणी लवकरच होणार आहे. कुमार मंगत यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पहिल्यांदा काहीही बोलण्यास नकार दिला. त्यानंतर आता त्याने पॅनोरमा स्टुडिओसह चित्रपट बनवत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. ईटाइम्सच्या अहवालानुसार मंगत यांनी यापूर्वी या प्रकल्पाबद्दल व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्सला सांगितले होते, पण त्यांनी त्याकडे विशेष लक्ष दिले नव्हते.
२०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम’ या चित्रपटात अभिनेता अजय देवगण, तब्बू आणि इशिता दत्ता मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले होते. अहवालानुसार आता ‘दृश्यम २’ मध्ये अजय देवगण आणि तब्बू आपल्या भूमिकेतून पुन्हा एकदा रुपेरी पडद्या वर दिसू शकतात. मात्र अद्याप चित्रपटाचे दिग्दर्शक आणि स्टारकास्ट याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
Discussion about this post