हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘फास्टर फेणे’ ही मराठी भाषेतील प्रचंड लोकप्रिय कादंबरी मालिका आहे. बालमित्रांसाठी ह्या कथा म्हणजे अगदी मनोरंजनाची पर्वणीच आहे. फास्टर फेणे हि पहिली वहिली बाल साहसावर आधारित अशी कादंबऱ्यांची अतिशय रंजक अशी मालिका आहे. या कादंबरी मालिकांचे लेखन प्रसिद्ध मराठी लेखक भास्कर रामचंद्र भागवत ऊर्फ भा. रा. भागवत यांनी केले आहे. या कथांवर आधारित चित्रपट देखील होऊन गेला आहे. या चित्रपटात मराठी अभिनेता अमेय वाघ झळकला होता. आता उन्हाळी सुट्टीचे औचित्य साधून स्टोरीटेल बालमित्रांसाठी या कथांचा ऑडिओ खजिना घेऊन येत आहे. इतकेच नव्हे तर या कथांचे कथन अमेय स्वतः करणार आहे.
याबालसाहसावर आधारित कादंबरी मालिकेत एकूण २० विविध आणि रंजक अश्या कथांची पुस्तके सामावलेली आहेत. तर आता ह्या पुस्तकांच्या सत्यप्रतीतील कथांची मालिका ऑडिओ फॉरमॅटमध्ये स्टोरीटेल’वर उपलब्ध झाली आहे. खास उन्हाळी सुट्टीचे औचित्य साधून छोट्या दोस्तांसाठी हि आगळी वेगळी रंजक भेट स्टोरीटेल घेऊन येत आहे. ‘फास्टर फेणे’ लोकप्रिय गुप्तहेर पात्रांपैकी एक असून दूरदर्शनवर प्रसारित होऊन गेलेल्या मालिकेत अभिनेता सुमीत राघवन झळकला होता. तर मराठी चित्रपटात अभिनेता अमेय वाघने फेणेची भूमिका साकारली होती.
अमेयने साकारलेला फेणे हा अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच भावला होता. त्यामुळे आता त्याच्याच लोकप्रिय आवाजात ही ऑडिओबुकची मालिका ‘स्टोरीटेल’ने बालदोस्तांसाठी आणली आहे. या पुस्तक मालिकेत २० पुस्तकांचा समावेश असून यातील सर्व कथांचे कथन अमेयच्या आवाजात होणार आहे. फास्टर फेणेच्या साहसी कथा प्रामुख्याने पुणे व आसपासच्या परिसरात घडल्याचे कथानक आहे. मात्र काही कथांमध्ये मुंबई, काश्मीर, इंडो-चायना बॉर्डर इतकेच नव्हे तर अफगाणिस्तानमध्ये देखील साहसी कृत्ये करताना तो दिसतो. त्यामुळे छोटे दोस्त फेणे सोबत दूरवर फेरफटका मारून येणार हे नक्की. अमेयच्या आवाजातील डिजिटल ऑडिओ कथा ऐकताना मुलांना एकंदरच खूप मजा येणार आहे. ‘स्टोरीटेल’च्या या ऑडिओबुकमुळे छोट्या उस्तादांचे हे समर व्हेकेशन विशेष ठरणार आहे.
Discussion about this post