हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपण नेहमीच कथा, कादंबऱ्या, ग्रंथ पुराणांमध्ये संसाराची जननी एका स्त्री बद्दल तिच्या अनोख्या रूपांबद्दल जाणून घेत असतो. यातूनच कळते कि देवाचा संसारही त्याला एकट्याला झेपत नाही. संसाराचा गाडा ओढायला बायको हवीच.. जिथे देवाला सोबतीची गरज आहे तिथे आपल्यासारख्या सामान्य माणसांचे काय! पण दुर्दैवाने प्रत्यक्षात बाईशिवाय घराला घरपण काय..? असं चित्र फार कमी ठिकाणी बघायला मिळतं. आजही पुरुषप्रधान विचारसरणीच्या जोरावर बायकांना दुय्यम स्थान दिले जाते. खरतर कुटुंबाचे अस्तित्व स्त्रीपासून सुरु होते आणि पूर्णत्वास जाते. पण तरीदेखील डावललं जातं तिलाच. अश्या विचारसारणीला हाणून पाडण्यासाठी व कर्तव्यानिशी आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करणाऱ्या स्त्रीविषयी भाष्य करणारे कथानक घेऊन एक नवीकोरी मराठी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या मालिकेची निर्मिती युफोरिया प्रॉडक्शन्स आणि पिकोलो फिल्म्सने केली असून लेखन – दिग्दर्शन विरेन प्रधान यांचे आहे. भय्यासाहेब राजेशिर्के हे खूप मोठं प्रस्थ असून त्यांचा मुलगा विभास ज्याच्या खांद्यावर घराची, व्यवसायाची जबाबदारी आहे. बाहेरून राजेशिर्के एक आदर्श कुटुंब पण घरातील चित्र या विरुध्द आहे. बायकांनी उबरंठा ओलांडायचा नाही, चूल आणि मूल याच काय त्या बायकांच्या जबाबदार्या अशी त्यांची विचारसरणी आहे. घरातील स्त्रियांच्या म्हणण्याला काडीमात्र महत्त्व दिले जात नाही. यामध्ये बायकांची घुसमट होत आहे.
याउलट एका छोट्या गावातील मध्यमवर्गीय कुटुंब जे स्त्री – पुरुष असा भेदभाव अजिबात मानत नाही. अशा घरात वाढलेली आजच्या विचारांची मुलगी जान्हवी जेव्हा पुरुषप्रधान संस्कृती रुजलेल्या घरामध्ये लग्न होऊन येते तेव्हा काय घडतं? विभास आणि जान्हवीचं लग्न कोणत्या परिस्थितीत होतं ? संसाराबद्दल या दोघांचीही मतं वेगळी आहेत. तर त्यांची मनं जुळतील का? हा प्रवास पाहणे रंजक असणार आहे.
या मालिकेतील मुख्य भूमिकेत अभिनेता विकास पाटील आणि अभिनेत्री गौरी देशपांडे दिसणार आहेत. मालिकेचे लेखक – दिग्दर्शक विरेन प्रधान म्हणाले, “शेंदूराचे लेप खरवडले की आत मूर्तीऐवजी दगड सापडतो, तसंच आधुनिकतेचा, संमजसपणाचा लेप खरवडला की बहुसंख्य पुरुषांचा स्त्रियांकडे बघण्याचा जुनाट दृष्टिकोन आजही तसाच आहे हे जाणवतं.लग्न करताना मुलगी बायको मटेरिअल पाहिजे म्हणजे स्वयंपाकपाणी करणारी, घर सांभाळणारी असावी आणि ते तिचं मुख्य ध्येय असावं हे पाहिलं जातं.
https://www.instagram.com/p/CNUKSpxpSuZ/?utm_source=ig_web_copy_link
हे ध्येय नवरा आणि बायको दोघे मिळून निभावू शकतात याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलं जातं. अजूनही बाईची कर्तव्य आणि पुरुषाची कर्तव्य अशी लेबलं लावूनच बायकांकडे पाहिलं जातं.. या मुखवटयाचं.. मुखवटयांआड घुसमटणा-या स्त्रियांची, आणि ते मुखवटे फाडून नवं, ख-या सहजीवनाचं चित्र उभं करणा-या नायिकेची ही गोष्ट आहे”. स्त्री शिवाय कुटुंब नाही, संसार नाही. पण, तरीही तिला तितकंसं महत्त्व कुटुंबात मिळत नाही आणि याचा अनुभव जान्हवीला राजेशिर्केंच्या घरी येणार आहे… जान्हवी तिच्या गोड स्वभावाने कसे त्यांचे मतपरिवर्तन करेल ? हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.
Discussion about this post