हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज लोकांसाठी दैवत आहेत. त्यांच्या जीवनाचे भाष्य करणे इतके साधे सोपे नाही. निधड्या छातीचा आणि स्वराज्यावर, आपल्या रयतेवर शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करणारा राजा मिळणे हे आपले भाग्यच आहे. अश्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मराठी दिग्दर्शक अजित शिरोळे आणि लेखक प्रताप गंगावणे यांनी ‘शिवपुत्र संभाजी’ या बहुभाषिक चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च केले आहे. या सिनेमाच्या पोस्टरने अगदी कमी वेळात प्रेक्षकांमध्ये अत्याधिक उत्सुकता निर्माण केली आहे.
बॉलिवूडमध्ये संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर हे ऐतिहासिक चित्रपटांसाठी विशेष ओळखले जातात. मात्र आता दिग्दर्शक अजित शिरोळे यांनी हे ऐतिहासिक चित्रपटाचे शिवधनुष्य हाती घेतले आहे. तब्बल १३ यशस्वी मराठी चित्रपट अजित शिरोळे यांनी यशस्वीरीत्या दिग्दर्शित केले आहेत. आनंद पिंपळकर यांचा ‘आलंय माझ्या राशीला’ हा लोकप्रिय चित्रपट अजित शिरोळे यांनीच दिग्दर्शित केला होता. आता अजित शिरोळे ‘शिवपुत्र संभाजी’ या ऐतिहासिक सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
शिवानी मूव्हीज आणि धनराज प्रॉडक्शनच्या संयुक्त निर्मितीतून ‘शिवपुत्र संभाजी’ हा सिनेमा एक दोन नव्हे तर तब्बल ४ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. शंभरहून अधिक सिनेमांचे लेखक, तसेच राजा शिवछत्रपती, स्वराज्यरक्षक संभाजी, स्वराज्य जननी जिजामाता, बाजीराव मस्तानी अशा ऐतिहासिक मालिकेचे लेखक असलेले प्रताप गंगावणे यांनी हा सिनेमा लिहिला आहे.लॉकडाऊन संपल्यावर सिनेमाचे शूटिंग रायगड, तुळापूर आणि संगमेश्वर अशा संभाजी महाराजांशी निगडीत असणाऱ्या सत्यापित ठिकाणांवर होणार आहे.
Discussion about this post