हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लोक अत्यंत हतबल होऊन आपल्या प्रियजनांना गमवण्याचे दुःख पचवीत आहेत. या कोरोनाच्या महामारीत अनेक कलाकार सिनेसृष्टीने गमावले. तर कित्येकांनी आपले प्रियजन. ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अनघाची भूमिका साकारणारी व रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान अध्यक्ष अभिनेत्री अश्विनी महांगडेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लोकांच्या दुःखाचा भाग होणारी अश्विनी आज स्वतः अत्यंत दुःखद प्रसंगाशी सामना करीत आहे. नुकतेच तिच्या वडिलांचे कोरोनामूळे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून भोर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
अभिनेत्री अश्विनी महांगडे हिचे वडील प्रदीपकुमार सदाशिव महांगडे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. दरम्यान ते भोर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते. ते ५६ वर्षांचे होते. त्यांच्यावर काल भोर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने दोन वर्षांपूर्वी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून तिने अनेक गरजू लोकांना मदत केली आहे. अनेक दुःखी आणि कष्टी लोकांच्या दुखत ती सामील होत असते आणि त्यांना मदतीचा हात देत असते. या प्रतिष्ठानाच्या सुरुवातीस तिच्या वडिलांनी तिला खंबीरपणे पाठिंबा दिला होता. कोरोनाच्या संकटात रुग्णांना बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर यांची कमतरता असल्यामुळे मिळत नाही आहेत. अशा परिस्थितीत रुग्णांची आणि पर्यायाने त्यांच्या सोबत आलेल्या नातेवाईकांची जेवणाशिवाय हेळसांड होऊ नये, यासाठी अश्विनी आणि रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान यांनी पुढाकार घेतला आहे.
अश्विनी महांगडे सध्या सामाजिक बांधिलकी जपणारी अभिनेत्री म्हणून गेल्या काही वर्षांपासून नाव लौकिक करताना दिसत आहे. खरं तर समाजसेवेचा हा वसा त्यांनी त्यांच्या वडिलांकडूनच घेतला आहे. कारण अश्विनी महांगडे यांचे वडील प्रदीपकुमार महांगडे हे सामाजिक कार्यकर्ते आणि पश्चिम भागाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून ओळखले जातात. भैरवनाथ देवालय ट्रस्टचे अध्यक्ष, भैरवनाथ स्कुल कमिटीचे सदस्य अशा विविध संस्थांची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर पेलली होती. सामाजिक बांधिलकी सोबतच त्यांनी मराठी चित्रपट आणि नाटकांतूनही अभिनय साकारला होता. त्यामुळे कलेची जाण त्यांना सुरुवातीपासूनच होती. शिवाय काही नाटकांचे दिग्दर्शन देखील त्यांनी केलेले होते.
अभिनेत्री अश्विनी महांगडेच्या कामाबद्दल बोलायचे झालेच तर, ती ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत एका मुख्य भूमिकेत झळकली होती. या मालिकेतील राणू आक्का साहेब या भूमिकेच्या माध्यमातून ती घराघरात पोहचली. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय व बहुचर्चित मालिका ‘आई कुठे काय करते’ यामध्ये अनघा नामक भूमिका साकारत आहे. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या आधी अश्विनी महांगडे अस्मिता मालिकेत सहाय्यक अभिनेत्री म्हणून मनाली नामक भूमिकेत पहायला मिळाली होती. याशिवाय तिने टपाल, बॉईज या मराठी चित्रपटातदेखील काम केले आहे.
Discussion about this post