हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। यश आणि अपयश या दोन गोष्टींच्या समीकरणावर लढत करीत मात करणे आणि उंच शिखरावर अटकेपार जाणे हा एक तर छंद असू शकतो नाही तर वेड. असेच वेड जोपासत सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात असणाऱ्या बावधन गावच्या एका नवोदित तरुणाने अव्वल कामगिरी करून दाखविली आहे. चित्रपट बनवण्याच्या वेडापायी त्याने चक्क आयफोनवर अख्खा चित्रपट चित्रित केला आहे. दिग्दर्शन, पटकथा लेखन, सिनेमॅटोग्राफी, संकलन या चारही भूमिका जबाबदारीने पार पाडत दिगंबर वीरकर हा तरुण ‘पिच्चर’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मुख्य म्हणजे हा चित्रपट एम एक्स प्लेयर वर प्रदर्शित झाला आहे.
आयफोनवर चित्रित होणारा हा सिनेसृष्टीतील पहिला चित्रपट आहे. ‘पिच्चर’ हा चित्रपट ‘वीरकर मोशन पिक्चर्स’द्वारे निर्मित असून दिग्दर्शक दिगंबर वीरकर यांनी दिग्दर्शित केलेला आहे. चित्रपटाची आवड जोपासत त्यांनी एका दर्जेदार कथेसह हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. कोणत्याही प्रकारचे चित्रकारणासाठीचे प्रशिक्षण न घेता चित्रित करण्यात आलेल्या या चित्रपटाची कथा अधिक उत्सुकता वाढवणारी आहे. आयुष्यात कोणत्या गोष्टीला किती प्राधान्य द्यायचे याबाबत या चित्रपटाचे कथानक रंजक वळण घेते.
आयफोनवर चित्रित होऊन प्रदर्शित झालेला ‘पिच्चर’ एकही गाण्याशिवाय गावाकडील देखावे उंचीवर नेत आहे. चित्रपटात जगदीश चव्हाण, राम गायकवाड, महेश आंबेकर, ऐश्वर्या शिंगाडे, अंकिता नरवणेकर, गणेश वीरकर, महेश्वर पाटणकर, कुशल शिंदे, सीमा निकम, सीमा वर्तक, सोनाली विभुते, रविकिरण दीक्षित, अविनाश धुळेकर या कलाकारांनी विविध आणि महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाला केदार दिवेकर यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. तर चित्रपटाचे साउंड डिझायनिंग निखिल लांजेकर यांनी केले आहे.
या चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक दिगंबर म्हणाले कि, “सिनेमा हे माध्यम माझ्यासाठी नवीनच आहे आणि हे असे माध्यम आहे जे आपल्यातल्या कलागुणांना जोपासण्याचे बळ देते. माझ्यातल्या कलागुणांना सर्वांसमोर आणण्यासाठी सिनेमा हे एक मोठे माध्यम मला मिळाले आहे. तसंच चित्रपटाच्या निर्मितीसाठी महेश्वर पाटणकर, सचिन गायकवाड, निलेश साळुंखे, मंगेश हाबडे, श्रीकांत निकम या माझ्या मित्रांचा खारीचा वाटा आहे. आयफोनवर चित्रित करत मी हा ‘पिच्चर’ सिनेमा दिग्दर्शित केला असून हा सिनेमा एमएक्स प्लेअरवर मोफत प्रेक्षकांना पाहता येणार आहे.’
Discussion about this post