हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे आज पहाटे निधन झाले. सकाळी ०७.३० वाजता मुंबई खारमधील हिंदूजा रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान ते ९८ वर्षांचे होते. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर सर्व स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. सर्वसामान्य चाहत्यांपासून ते बॉलिवूड जगतातील दिग्गज आणि अनेको मंत्री दिलीप कुमार यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना दिसत आहेत. यानंतर आता, दिलीप कुमार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसस्कार करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात होतील अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्या आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 7, 2021
गेल्या पाच दशकांहून अधिक काळ बॉलिवूड जगतामध्ये दिलीप कुमार यांनी स्वतःची अशी वेगळी छाप पाडली होती. ‘मुगल-ए-आजम’, ‘देवदास’, ‘नया दौर’, ‘राम और श्याम’ असे एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट त्यांनी सिनेसृष्टीला दिले. मात्र १९९८ सालामध्ये आलेला ‘किला’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
बॉलिवूड जगताशी अत्यंत सलगी असणाऱ्या मुंबईसह दिलीप कुमार यांचे अत्यंत जवळचे नाते आहे. त्यामुळेच, जगप्रसिद्ध भूमिपुत्राचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. दरम्यान, सांताक्रुझ येथील जुहू कब्रस्तान येथे सायंकाळी ५ वाजता दिलीप कुमार यांच्या पार्थिवावर दफन विधी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर देण्यात आली आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा, रूपेरी नभांगणातला लखलखता तारा निखळला. अजरामर भूमिका साकारणारे दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामर राहील. ज्येष्ठ अभिनेते पद्मविभूषण दिलीप कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
– मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 7, 2021
भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा, रूपेरी नभांगणातला लखलखता तारा निखळला. अजरामर भूमिका साकारणारे दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामर राहील. ज्येष्ठ अभिनेते पद्मविभूषण दिलीप कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलीप कुमार यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त करीत त्यांना आदरांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दिलीप कुमार यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना, ही देशाची सांस्कृतिक हानी असल्याचे म्हणत दु:ख व्यक्त केले आहे. शिवाय मोदी यांनी सायरा बानो यांच्याशी फोनवर संवाद साधत त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आहे.
Discussion about this post