हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योजक राज कुंद्रा याचे पॉर्नोग्राफीचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. सध्या विविध पद्धतीने कुंद्राचे राज उघडण्यात प्रशासन व्यग्र आहे. तर आता या रॅकेटच्या तपासाला चांगलाच वेग आला आहे. दरम्यान राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्या अडचणीत वाढ होण्याचे संकेत दिसत आहेत. कारण, आता सक्तवसुली संचालनालय (ईडी) सक्रिय झाले आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार असून बरीच रक्कम परदेशात वळविण्यात आल्याचे समोर येत असल्यामुळे ईडी या प्रकरणाचा छडा लावण्यास सज्ज आहे.
सूत्रांनुसार, ED’ने मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेकडे प्राथमिक अहवाल मागविला आहे. त्यानंतर येत्या दिवसांमध्ये प्रत्यक्ष तपास सुरू होणार आहे. अर्थात, पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात राज कुंद्रा याला अटक केल्यानंतर ईडीने मुंबई पोलिसांकडून एफआयआर व आतापर्यंतच्या प्राथमिक तपासाचा अहवाल मागविला आहे. त्यानंतर मनी लॉड्रिंगअंर्तगत गुन्हा नोंद केला जाईल. ईडीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्राला फेमाअंतर्गत नोटीस समन्स बजावले जाणार आहे. शिवाय या प्रकरणी कंपनीच्या संचालकांची चौकशी होऊ शकते. त्यामुळे साहजिकच शिल्पा शेट्टीची चौकशी होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणी पुढील तपासासाठी, पोलिसांनी राज कुंद्रा व त्याच्या साथीदाराच्या न्यायालयीन कोठडीची मुदत वाढवून मागितली होती. त्यामुळे राज कुंद्रा आणि त्याचा साथीदार रायन थॉर्पला मंगळवारी दंडाधिकारी न्यायालयाने १४ दिवसांची अधिक न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या दरम्यान कुंद्राकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आला असून, बुधवारी त्यावर सुनावणी होणार असल्याची माहिती मिळत आहे. क्राइम ब्रांचने केलेल्या तपासानुसार आणि अन्य माहितीप्रमाणे या प्रकरणातील राज कुंद्रा हाच मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय, कुंद्राच्या ऑफिसवर छाप्यादरम्यान ५१ अश्लील व्हिडिओ जप्त केले आहेत. तर, हॉटशॉटसाठी ॲपलकडून १ कोटी १३ लाख ६४ हजार ८८६ रुपयेदेखील त्याला मिळाले होते. हे पैसे त्याच्या कोटक महिंद्रा बँकेत जमा झाले आहेत. त्यामुळे कुंद्राच्या सिटी बँक आणि कोटक महिंद्रा बँकेचे खाते सील करून गुगलवरील व्यवहाराची माहिती घेतली जात आहे. तर घरावरील छाप्यादरम्यान अनेको इलेक्ट्रॉनिक पुरावे मिळाले असून यासाठी फॉरेन्सिक ऑडिटर नेमण्यात आला आहे.
Discussion about this post