हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अंगी कला असेल आणि ती जोपासण्याची जिद्द असेल तर एखादी व्यक्ती इतरांना अशक्य वाटणारी गोष्ट अगदी सहज करू शकते. आपल्या कलेवर प्रेम आणि निष्ठा ठेवून जोमाने काम करणारा नेहमीच यशस्वी होतो आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे शशी चंद्रकांत खंदारे. एकेवेळी क्लॅप बॉय म्हणून काम करणारे शशी आता थेट दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. कामाप्रती प्रेम आणि आवड जोपासणाऱ्या शशी यांना चित्रपट बनविण्याची हौस होती आणि हि त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. गेल्या कित्येक वर्षांपासून ते या क्षेत्रात धडपड करत होते. अखेर त्यांच्या मेहनतीला यश आलं आणि त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न साकारलंच.
जिप्सी हा शब्द कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या कवितेमुळे आपल्याला माहीत झाला आहे आणि आता याच शब्दाचे शीर्षक करून “जिप्सी” या चित्रपटातून शशि चंद्रकांत खंदारे दिग्दर्शकीय पदार्पण करत आहेत. विशेष म्हणजे, क्लॅपबॉय ते दिग्दर्शक असा शशि चंद्रकांत खंदारे यांचा प्रवास खडतर तितकाच प्रेरणादायी आहे. सध्या ‘जिप्सी’ या चित्रपटाचे टीजर पोस्टर सोशल मीडियावर सादर करण्यात आले असून त्यास प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यश मनोहर सणस त्यांच्या यश सणस फिल्म्स या निर्मिती संस्थेद्वारे बोलपट क्रिएशन्सच्या सहयोगाने या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
शशी चंद्रकांत खंदारे यांनी आतापर्यंत २५ हून अधिक चित्रपटांसाठी क्लॅप बॉय, सहाय्यक दिग्दर्शक अशा विविध जवाबदाऱ्या अगदी जोमाने निभावल्या आहेत. यानंतर आपली आवड जोपासत आणि स्वप्न सत्यात साकारत त्यांनी जिप्सीच्या माध्यातून एक नवी सुरुवात केली आहे. इतकेच नव्हे तर या चित्रपटाची कथा देखील त्यांचीच आहे. माहितीनुसार या चित्रपटाचे चित्रीकरण येत्या महिन्यापासून सुरू होणार असून कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा अशा तीन राज्यात होणार आहे. मुळात “जिप्सी” या नावातून हा चित्रपट साधारण प्रवासवर्णन या विभागात असणार हे स्पष्ट होत असले तरी टीजर पोस्टरमध्ये मोकळे आकाश दिसत असल्याने चित्रपटाच्या कथानकाचा सुगावा लागत नाही. त्यामुळे यात नेमके काय असेल हे जाणून घेण्याची एक अनोखीच उत्सुकता लागली आहे. शिवाय चित्रपटात कोणकोणत्या भूमिका कोणते कलाकारानं साकारणार हेदेखील अद्याप जाहीर केलेले नाही.
Discussion about this post