हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गायिका ‘सावनी रवींद्र’च्या कुटुंबात एका लहानग्या परीचे आगमन झाले आहे. सावनी आणि तिचे पती डॉ. आशिष धांडे हे आता आई बाबा झाले आहेत. सावनीने मुलीला जन्म दिला आहे. त्यांच्या जीवनात हर्षाचा वर्षाव करणाऱ्या चिमुकल्या बाळाचे आगमन झाले आहे. गर्भारपणात मे महिन्यामध्ये पहिल्यांदा सावनीने सोशल मीडियावर फोटो शेअर करून गरोदर असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तिने डोहळ जेवणाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केले. या फोटोंवर रसिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता. तिने मनसोक्त गर्भारपण अनुभवत सोशल मीडियावर बराच वेळ दिला आहे. तिने फोटो शेअर करत बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असल्याचेही सांगितले होते. अखेर तो दिवस उजाडला आणि सावनीला आईपण देणाऱ्या गोड लेकीचा जन्म झाला.
सावनीने तिच्या प्रेग्नंसीदरम्यान एक पोस्ट शेअर करत तिच्या आईपणाची भावना व्यक्त केली होती. यात तिने म्हटले होते की ”माझ्या मनात सध्या खूप अलौकीक भावना आहेत. ज्या मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. आजवर मी गायिका म्हणून आईपणावर वेगवेगळ्या धाटणीची गाणी गायली आहेत.
अंगाईगीत, डोहाळ जेवणाचे गीत, बारश्याची गाणी मी या आधी गायली होती. पण आता मी स्वत: त्या भूमिकेत जाणारं आहे. त्यामुळे आईपण अनुभवण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मला अस वाटतं की प्रत्येक स्त्री ही भाग्यवान असते. कारण ती आई होऊ शकते. आईपण काय असतं हे फक्त एक आईच जाणू शकते. आणि सध्या मी मातृत्वाच्या उंबरठ्यावर आहे. आणि या फेजचा मी पुरेपुरं आनंद घेत असल्याचे सांगितले होते.”
पुढे ती सांगते, ”माझं बाळ माझ्यासाठी लकी चार्म आहे. कारण माझं बाळ पोटात असताना मला माझ्या आयुष्यातील इतका मोठा प्रतिष्ठीत राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच गेल्या सहा महिन्यात मी गरोदरपणात अनेक वेगवेगळे म्युझीक अल्बम, नविन गाणी, काही प्रोजेक्टस शूट केलेत. त्यातील बरीचशी गाणी रिलीज झाली. काही गाणी लवकरच रिलीज होतील. मला खूप अभिमान आहे की माझ्या होणा-या बाळाने मला त्या परिस्थितीत अजिबात त्रास दिलेला नाही. आता मी माझ्या बाळाच्या स्वागतासाठी फारचं उत्सुक असल्याचे तिने सांगितले होते.
मागील काही महिन्यांत श्रेया घोषाल, प्रियांका बर्वे, शशांक केतकर, आरोह वेलणकर, निपुण धर्माधिकारी, अक्षय वाघमारे आणि संकर्षण कऱ्हाडे अश्या बऱ्याच कलाकारांच्या घरी चिमुकल्यांचं आगमन झाल्यानंतर आता सावनीने देखील गूड न्यूज दिली आहे.
Discussion about this post