हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे जवळ जवळ १७ वर्षानंतर छोट्या पडद्यावर ‘तुझी माझी रेशीमगाठ’ या मालिकेच्या माध्यमातून कमबॅक करतोय. यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये एक अनोखीच उत्सुकता होती. मात्र या दरम्यान त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची मोठी बातमी समोर आल्यामुळे चाहत्यांचा उत्साह जणू शमला आहे. लोकप्रिय नाटक ‘अलबत्या गलबत्या’चे निर्माते राहुल भंडारे यांनी या नाटकाचा सेट कल्पना न देता अनधिकृतपणे वापरल्याचा आरोप श्रेयसवर केला आहे. याबाबत बोलताना श्रेयसने हा आरोप बिनबुडाचा असून चीप पब्लिसिटीचा प्रकार असल्याचे म्हटले आहे.
निर्माते राहुल भंडारे यांनी ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाचा सेट चोरीला गेला असल्याची तक्रार शिवडी पोलिस ठाण्यात दिली आहे. याबाबत ते म्हणाले, माझ्या अलबत्या गलबत्या नाटकाचा सेट प्रवीण भोसले यांच्या काळाचौकीतील गोदामात ठेवण्यात आला होता. मात्र, तो सेट कोणतीही कल्पना न देता श्रेयस तळपदे आणि सुरेश सावंत यांनी गोदाम मालकास खोटे सांगून ‘भक्षक’ एकांकिकेच्या चित्रीकरणासाठी वापरला,’ असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. .
याबाबत अधिकृत खुलासा करीत श्रेयस म्हणतो कि, कोरोना साथीच्या काळात मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती रंगभूमी तसेच इतर भाषांमधील आणखी काही रंगभूमींशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक घटकाला आर्थिक पाठबळ देण्याचे काम ‘नाईन रसा’ या माझ्या ओटीटी प्लॅटफॉर्मने काम केले. परंतु, या प्लॅटफॉर्मची वाढती लोकप्रियता काही लोकांच्या डोळ्यात आता खुपू लागली आहे. तसा प्रकार नुकताच घडला आहे. नाट्यनिर्माते राहुल मधुकर भंडारे यांनी आपल्या ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकातील सेट चोरीला गेला असून तो आमच्या प्लॅटफॉर्मवरील ‘भक्षक; नावाच्या एका एकांकिकेत वापरला गेल्याचा आरोप माध्यमांकडे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. यासंदर्भात त्यांनी पोलिसांकडे तक्रारही दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी थेट माझ्या नावाचा उल्लेख केल्याने त्याबाबत काही गोष्टी मी स्पष्ट करू इच्छितो.
पुढे, पहिली गोष्ट ‘नाइन रसा’वर सादर झालेली विविध भाषांमधील सर्व नाटके किंवा एकांकिकांच्या सादरीकरणाची जबाबदारी व्यावसायिक निर्मात्यांवर सोपवण्यात आली आहे. त्यांच्याशी आम्ही एक रितसर करार करतो. त्यामध्ये नाटकाशी संबंधित विविध हक्क तसेच इतर गोष्टींचा समावेश असतो. हे निर्मातेच आपल्या कलाकृतीमध्ये कोणते नेपथ्य वापरायचे आहे, याचा निर्णय घेतात. त्याच्याशी ‘नाइन रसा’ या प्लॅटफॉर्मचा काहीच संबंध नसतो. आमच्या प्लॅटफॉर्मसाठी ‘भक्षक’ या नाटकाची निर्मिती प्रसिद्ध निर्माते-अभिनेते सुशांत शेलार यांच्या कंपनीतर्फे करण्यात आलेली आहे. त्यामुळे ‘भक्षक’मध्ये वापरलेला सेट हा नवीन आहे की अन्य कोणाचा आहे, तो आमच्या एकांकिकेत कोठून आला याची मला वैयक्तिकरित्या काहीच कल्पना नाही. त्यामुळे भंडारी यांना सेटबद्दल काही आक्षेप असतील तर त्यांनी आधी या एकांकिकेचे निर्माते सुशांत शेलार यांच्याशी संपर्क साधायला हवा होता. तसे न करता त्यांनी या प्रकाराबद्दल थेट मला वैयक्तिकरित्या जबाबदार धरून पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रकार अत्यंत अनुचित आणि माझ्या समाजातील प्रतिमेला धक्का देणारा आहे.
पुढे, दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये गेल्या काही महिन्यांपासून आमच्या विविध भाषांमधील कलाकृतींचे चित्रीकरण सुरू आहे. करोना काळात रंगभूमीवरील व्यावसायिक नाटकांच्या प्रयोगांच्या सादरीकरणाला बंदी असली तरी ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी काही अटी आणि शर्तींसह नाटक-एकांकिकांच्या चित्रीकरणास परवानगी होती. त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने आखून दिलेल्या सर्व अटी आणि नियमांचे पालन करूनच आम्ही हे चित्रीकरण केले आहे. त्यासाठी पोलीस, महापालिका आदी यंत्रणांची रितसर परवानगी आम्ही घेतलेली आहे. त्याबद्दलची सर्व कागदपत्रे आमच्याकडे आहेत. तसे आम्ही केले नसते तर सावरकर स्मारकाच्या व्यवस्थापनाने आम्हाला त्यांचे सभागृह चित्रीत करण्याची परवानगी दिली नसती. हे वास्तव असूनही आम्ही सावरकर स्मारकामध्ये बेकायदा चित्रीकरण केल्याचा आणि नियमांचा भंग केल्याचा आरोप होत आहे. हा आरोपदेखील धादांत खोटा आहे. हे सर्व आरोप असूयेपोटी केले असावेत, असे मला वाटते. नाईन रसा प्लॅटफॉर्मची वाढती लोकप्रियता लक्षात आल्यामुळेच कदाचित ‘चीप पब्लिसिटी’च्या दृष्टीने असे आरोप झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे झाल्या प्रकाराबाबत भंडारे यांच्याविरुद्ध कायदेशीर प्रक्रियेद्वारे मानहानीचा दावा करण्याचाही मी विचार करीत आहे.
Discussion about this post