हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एखाद्या शांत सौम्य प्रवाहापेक्षा वेगळे आणि धडाडीचे मुद्दे घेऊन शाळा’, ‘फुंतरू’, ‘आजोबा’, ‘केसरी’ असे एकापेक्षा एक चित्रपट साकारणारा तरुण दिग्दर्शक सुजय डहाके आता पुन्हा एक नवा प्रयत्न करतोय. सुजय आता मौल्यवान इतिहासाची पानं उलगडत श्यामच्या आईची ओळख करून घेतोय. भारताच्या ७५ व्या १५ ऑगस्ट दिनी अर्थात स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी पोस्टर रिलीजच्या माध्यमातून त्याने आपल्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. सुजयने ‘श्यामची आई’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे.
‘श्यामची आई’ या चित्रपटाची निर्मिती अमृता अरूण राव करीत आहेत. तर पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजींच्या मूळ कादंबरीवर या चित्रपटाचे कथानक आधारलेले असणार आहे. यंदाचे वर्ष भारतीय सिनेसृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या १५०व्या जयंतीचे आहे. या पुण्यपर्वाचे औचित्य साधत ‘श्यामची आई’ हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट सुरू करण्याचा धाडसी निर्णय सुजयने घेतला आहे. या चित्रपटाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट असणार आहे. शिवाय यात ब्रिटिश राजवटीतील १९१२ ते १९४७ पर्यंतचा काळ दाखविला जाईल. या चित्रपटाबाबत अन्य कोणतीही माहिती अद्याप जाहीर केलेली नाही.
हा चित्रपट २०२२ दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्याची योजना आहे. तर अद्याप चित्रपटातील कलाकारांची निवड करण्यात आलेली नसून, ऑडीशनच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटाचा जुन्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाशी काहीही संबंध नाही. ‘शाळा’ या पहिल्या चित्रपटापासून सुजयच्या मनात ‘श्यामची आई’ हा प्रोजेक्ट बनवण्याचा विचार घोळत होता. त्यामुळे सुजय गेले कित्येक दिवस या चित्रपटावर रिसर्च करत होता. यासाठी आपण पाच-सहा वर्षे मेहनत घेतली असून, ‘श्यामची आई’ बनवण्यासाठी हा सर्वोत्तम काळ असल्याचे सुजयने म्हटले आहे.
Discussion about this post