हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गतवर्षापासून कोरोना महामारीच्या वाढत्या संसर्गामुळे राज्याच्या नियमावलीत अधिक कडक निर्बंध तयार करण्यात आले होते. यात दीर्घकाळापासून राज्यातील चित्रपटगृहांना टाळे लावण्यात आले. परिणामी चित्रपटगृहाशी संबंधित सर्व कामगार आणि साहजिकच चित्रपटगृहांचे मालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यानंतर आता गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह अख्ख्या महाराष्ट्रात कोरोनाचे निर्बंध बहुतांशी शिथील करण्यात आले आहेत. दरम्यान मॉलही उघडले आहेत. पण अद्याप चित्रपटगृहाचे दार टाळे बंद दिसत आहे. अजूनही चित्रपटगृह उघडण्याची परवानगी दिलेली नाही. यामुळे अनेक कलाकार आणि कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत आता बॉलिवूड अभिनेता वरुण धवननेदेखील ठाकरे सरकारला चित्रपटगृह बंद का असा सवाल विचारला आहे.
मुख्य म्हणजे, काही राज्यांत ५० टक्के क्षमतेने चित्रपटगृह खुली करण्यात आलेली आहेत. पण महाराष्ट्रासह अनेक राज्यांत अजूनही चित्रपटगृहाच्या टाळे बंद आहे. त्यामुळे राज्यात याविरोधात चित्रपटसृष्टीच्या कलाकरांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. बॉलिवूड अभिनेता वरूण धवन याने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात मुंबईतील वांद्रे भाग गर्दीने गजबलेला दिसत आहे. येथे अगदी सर्व काही सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे वरूणने या व्हिडीओचा संदर्भ देत, ‘सगळं काही सुरू आहे, मग चित्रपटगृह बंद का?’, असे लिहित नाराजी व्यक्त करणारा इमोजी देखील शेअर केला आहे. वरुणसारखे कित्येक कलाकार आज ठाकरे सरकारला चित्रपट गृह बंद का अशी विचारणा करताना दिसत आहेत मात्र तरीही अद्याप सरकारकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.
महाराष्ट्र राज्यात जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार शॉपिंग मॉल आणि जिमसारख्या गोष्टीवरचे निर्बंध शिथील केले आहेत. मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, पंजाब, हरियाणा, गुजरात या राज्यांनी चित्रपटगृह सुरू केली असून महाराष्ट्रातच यावर निर्बंध का? असा सवाल उपस्थित होतो. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनीही चित्रपटगृह बंद असल्यावर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान लॉकडाऊननंतर सर्व काही सुरू झाले. मग चित्रपटगृह बंद का? विमानातही लोक एकमेकांच्या शेजारी बसतात, ते चालतं मग चित्रपटगृहांबद्दलच ही भूमिका का? असा सवाल त्यांनी संतप्त होत व्यक्त केला आहे. संजय लीला भन्साळींचा ‘गंगूबाई काठेवाडी’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे आणि ती चित्रपटगृहांतच प्रदर्शित व्हावा, अशी भन्साळींची इच्छा आहे.
Discussion about this post