हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चिरंजीवी हे दाक्षिणात्य मनोरंजन क्षेत्रातील अत्यंत प्रसिद्ध अभिनेते आहेत. चिरंजीवी हे केवळ दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीपुरता मर्यादित नाहीत, तर संपूर्ण भारतात अत्याधिक चर्चेत असलेले अभिनेते आहेत. त्यांचे कित्येक फॅन्स आहेत. त्यामुळे चाहत्यांचे त्यांच्यासाठीच प्रेम आणि वेडेपण अगदी डोळे दिपवण्यासारखे आहे. खरतर हेच कारण आहे की जेव्हा चिरंजीवी राजकारणाकडे वळले तेव्हा लोकांनी त्यांना तिथेही खूप प्रेम दिले. अश्या या लोकांच्या तज्ज्ञ अभिनेता आणि नेत्याचा आज वाढदिवस आहे. चिरंजीवी त्यांच्या रेकॉर्ड ब्रेक चित्रपटांमुळे भारतीय माध्यमांत “मेगास्टार” म्हणून ओळखले जातात आहेत. चिरंजीवी यांना एक दोन नव्हे तर तब्बल सात वेळा दक्षिण भारतीय फिल्मफेअर पुरस्कार आणि चार वेळा नंदी पुरस्कार मिळाला आहे.
मेगास्टार चिरंजीवी यांचा जन्म २२ ऑगस्ट १९५५ रोजी आंध्र प्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यात झाला. त्यांचे मूळ नाव कोनिडेल शिव शंकर वारा प्रसाद असून त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची विशेष आवड होती. त्यांनी सीएसआर शर्मा कॉलेज, ओगोळे -आंध्र प्रदेश मधून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि वाणिज्य शाखेतून पदवी घेतली आहे. शिक्षण पूर्ण करून ते चेन्नईला अभिनय शिकण्यासाठी मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले.
यानंतर १९८० सालामध्ये दक्षिण भारतीय चित्रपटांतील प्रसिद्ध विनोदी कलाकार अल्लू राम लिंगैया यांची मुलगी सुरेखा हिच्याशी त्यांनी लग्न केले.
या दोघांनाही सुष्मिता आणि श्रीजा नावाच्या दोन मुले आणि रामचरण तेजा नावाचा मुलगा आहे. रामचरण हा देखील तेलुगु सिनेसृष्टीतील अत्यंत आघाडीचा अभिनेता आहे.
चिरंजीवी यांनी १९७९ मध्ये तब्बल चौदा मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले. यानंतर चिरंजीवी यांनी ‘मोसागडू’, ‘राणी कसुला रंगम्मा’ सारख्या चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारुनही बरीच लोकप्रियता मिळवली .हे दशक त्यांच्या कारकिर्दीतीळ अत्यंत यशस्वी ठरले. यानंतर १९९७मध्ये त्यांनी ‘हिटलर’ चित्रपटाच्या माध्यमातून समीक्षकांकडून खूप प्रशंसा मिळवली. परंतु या सर्व चित्रपटांच्या यशातून अधिक यश आणि प्रेम मिळवून देणारा २००२ साली प्रदर्शित झालेला ‘इंद्रा’ चित्रपटाने त्यांचे यशाचे सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले आणि हा चित्रपट आजही तितक्याच आवडीने पहिला जातो. राजकारणात येण्यापूर्वी चिरंजीवी यांचा शेवटचा चित्रपट ‘शंकर दादा जिंदाबाद’ हा होता.
चिरंजीवी जितके कुशल अभिनेता म्हणून ओळखले जातात तिकतेचं कुशल नेता म्हणूनही ओळखले जातात. कारण २००८ मध्ये त्यांनी आंध्र प्रदेशातील सर्व घटकांना सामाजिक न्याय देण्याच्या उद्देशाने ‘प्रजा राज्यम पार्टी’ या प्रादेशिक राजकीय पक्षाची स्थापना केली. पुढे २००९मध्ये विधानसभा निवडणुकीत या पक्षाने १८ जागा जिंकल्या. मात्र २०११ साली हा पक्ष औपचारिकरित्या आंध्रतील सत्ताधारी काँग्रेसमध्ये विलीन झाला.
चित्रपट आणि पक्ष या व्यतिरिक्त चिरंजीवी यांची ओळख एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून देखील आहे. कारण त्यांनी १९९८ साली ‘चिरंजीवी चॅरिटी ट्रस्ट’ची स्थापना केली होती. ज्यात रक्तपेढी आणि अनेक नेत्र बँका समाविष्ट आहेत. आंध्र प्रदेश सरकारने त्यांच्या संस्थेला जास्तीत जास्त रक्त मदतनिधी जमा केल्याबद्दल बक्षीसही दिले आहे. असा हा लोकोपयोगी अभिनेता आणि नेता कुणाला भावणार नाही. तर मेगास्टार चिरंजीवी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Discussion about this post