हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या सिने इंडस्ट्रीमध्ये कित्येक कलाकार असे आहेत ज्यांनी मोठमोठ्या रोगांवर हसत हसत मात केली आहे. यात बहुतांशी कलाकारांना कॅन्सरचे निदान झाले होते. रोग मोठा होता मात्र जिद्द त्याहूनही मोठी होती त्यामुळे आज ते सर्व कलाकार आपल्या कुटुंबियांसोबत आनंदाने जगत आहेत. यानंतर आता सगळ्यात मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे, प्रसिद्ध दिग्दर्शक आणि दिग्गज अभिनेते महेश मांजरेकर यांना देखील कॅन्सर असल्याचे समोर आले आहे. मुख्य म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार महेश मांजरेकर यांची एक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या नुकतीच पार पडली आहे आणि आता त्यांच्या तब्येतीत बरीच सुधारणा असल्याची माहिती मिळत आहे.
महेश मांजरेकर यांना ब्लॅडर कॅन्सर असल्याचे निदान झाले आहे. त्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांना शस्त्रक्रिया करण्याचे सूचित करण्यात आले होते. इ टाईम्सच्या वृत्तानुसार, १० दिवसांपूर्वी मुंबईतील चर्नी रोड येथील एच. एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली आहे. दरम्यान ६३ वर्षीय महेश मांजरेकर आता आजारपणातून बाहेर पडत असल्याची माहिती मिळत आहे. शिवाय त्यांच्या प्रकृतीतही बऱ्यापैकी सुधारणा असल्याचे वृत्त आहे. तर टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी झाले असून ते आता आपल्या घरी देखील आले आहेत आणि ते घरी आल्यानंतर त्यांना आता बरे वाटत आहे.
महेश मांजरेकर यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झालेच तर, चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध दिग्दर्शक आणि लोकप्रिय अभिनेते म्हणून त्यांची ओळख आहे. महेश मांजरेकर यांनी हिंदीशिवाय तमीळ आणि मराठी चित्रपटातही काम केले आहे. तसेच त्यांनी अनेक मराठी नाटकंदेखील केली आहेत. त्यांनी १९९२ साली मराठी चित्रपट जीव सखा मधून रूपेरी पडद्यावर पदार्पण केले. यानंतर त्यांनी बऱ्याच चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कांटे, मुसाफिर, रन, दस कहानियां, दबंग हे महेश मांजरेकर यांचे हिट चित्रपट आहेत. याशिवाय झलक दिखला जा, अरे दीवानों मुझे पहचानों, महाराष्ट्र सुपरस्टार १, बिग बॉस मराठी सीझन १ आणि २ या शोमध्ये ते कधी जज तर कधी होस्ट म्हणून झळकले आहेत.
याशिवाय काही दिवसांपूर्वीच बिग बॉस ३’ची घोषणा झाली आहे आणि महेश मांजरेकर या शोचे सूत्रसंचालन करताना पुन्हा एकदा नव्या जोशात दिसणार आहेत. पण सध्या तरी हा शो कधी सुरू होणार याची माहिती देण्यात आलेली नाही. तसेच या शोसोबत महेश मांजरेकर ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक ‘अंतिम’चे दिगदर्शनदेखील करीत आहेत. माहितीनुसार या चित्रपटात सलमान खानची बहीण अर्पिता हीच नवरा आयुष शर्मा झळकणार आहे. महेश मांजरेकर यांची लेक साई मांजरेकर हिने देखील सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. दबंग मध्ये ती सलमान खानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसली होती.
Discussion about this post