हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील आणि छोट्या पडद्यावरील अत्यंत श्रवणीय सिंगिंग रिऍलिटी शो म्हणजे म्हणजे इंडियन आयडल. दरम्यान इंडियन आयडल या सिंगिंग रिऍलिटी शोने आपला असा वेगळा चाहतावर्ग प्रस्थापित केला असताना याबाबत एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पहिल्यांदाच इंडियन आयडॉल मराठीत प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहे. होय. आता लवकरच सोनी मराठी वाहिनीवर आपल्याला आपला आवडता शो ‘इंडियन आयडल – मराठी’ पाहायला मिळणार आहे. सर्व स्तरावरील कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘इंडियन आयडल – मराठी’ ही एक विशेष आणि सुवर्णसंधी ठरणार आहे. याहीपेक्षा मोठी आनंदाची बातमी म्हणजे या दर्जेदार कार्यक्रमाचे परीक्षण संगीतसृष्टीतील दिग्गज आणि झिंगाट जोडी अजय-अतुल करताना दिसणार आहेत. त्यामुळे आता जल्लोष डबल होणार आहे.
याबाबत पुण्यात नारायण पेठ येथे भित्तिचित्राद्वारे परीक्षकांची घोषणा करण्यात आली असून यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, सोनी मराठी वाहिनीचे बिजनेस हेड श्री. अजय भाळवणकर, क्रिएटिव्ह डिरेक्टर श्री.अमित फाळके आणि फ्रीमेन्टल निर्मिती संस्थेचे केशव कौल हे सर्व मान्यवर उपस्थित होते. आपल्या संगीताचे गारुड आणि आवाजाच्या सुरांनी श्रोत्यांना भुरळ घालणारे अजय – अतुल हे दिसायला दोन पण आविष्काराने एक आहेत. या जोडीने नुसता महाराष्ट्र नाही तर अवघा देश जिंकला आहे. आज प्रत्येकाच्या मना मनावर त्यांचे नाव कोरले गेले आहे. या जोडीने आपल्या सांगीतिक प्रवासाला पुण्यातून सुरुवात केली आणि त्यामुळे आता पुण्यात या भित्तचित्राद्वारे त्या दोघांचे नाव ‘इंडियन आयडॉल – मराठी’ या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून घोषित करण्यात आले.
मराठी मनोरंजन विश्वात पहिल्यांदाच अशा प्रकारे परीक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे या पोस्टरची चर्चा एकदम जंगी सुरु आहे. पुणे शहरात या भित्तिचित्राची जो तो प्रशंसा करतोय आणि ऐकलं का म्हणत सगळीकडे चर्चा करतोय. कारण शहराच्या मधोमध असलेले हे चित्रं पुणे शहरवासीयांसाठी अत्यंत लक्षवेधक असे पोस्टर ठरताना दिसत आहे. मुख्य आणि तितकीच कौतुकाची बाब म्हणजे निखिल सतिश खैरनार या कलाकाराने हे भित्तिचित्र काढले आहे. या एका चित्राने अख्ख पुणं गाजवलंय असं म्हणायला काही हरकत नाही. काय मग? इंडियन आयडल मराठीसाठी तयार ना? कारण सोनी मराठी तर सज्ज आहे अवघ्या महाराष्ट्राला वेड लावायला.
Discussion about this post