हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने देशाच्या स्वातंत्र्याविषयी अतिशय वादग्रस्त विधान केले होते. ती म्हणाली होती कि, भारताला १९४७ मध्ये भीक मिळाली होती स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. खरं स्वातंत्र्य २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यावर मिळालं. यानंतर मोठा वाद उफाळला आहे. हा वाद अद्याप कायम असताना कंगनाने आणखी काही धक्कादायक वक्तव्य केली आहेत. सुभाषचंद्र बोस आणि भगत सिंग यांना महात्मा गांधींकडून पाठिंबा मिळाला नसल्याचा दावा करत कंगनाने मंगळवारी आणखी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. इतकेच काय तर तिने गांधींच्या अहिंसावादाची खिल्ली उडवत दुसरा गाल पुढे करून ‘भीक मिळते’ स्वातंत्र्य मिळत नाही असे म्हटले आहे.
अभिनेत्री कंगना रनौतने इंस्टाग्रामवर एकामागून एक पोस्ट करत थेट बापूंवर अर्थात महात्मा गांधींवर निशाणा साधला आहे. इतकेच नव्हे तर, लोकांना नायक समजूतदारपणे निवडण्याचा सल्लादेखील तिने दिला आहे. कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीजवर एक न्यूज कटिंग आणि दोन मोठे संदेश पोस्ट केले आहेत. यातील पहिल्या पोस्टमध्ये कंगना म्हणते की, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, त्यांना सत्तेच्या भुकेल्या आणि धूर्त लोकांनी त्यांच्या मालकांच्या स्वाधीन केले होते.
हे तेच लोक होते ज्यांनी त्यांचे शोषण केले. यांच्यात लढण्याची हिंमत नव्हती किंवा त्यांचे रक्तही उसळले नाही. हेच लोक आम्हाला शिकवतात, जर तुम्हाला कोणी थप्पड मारली तर दुसर्या गालावर दुसरी थप्पड खा आणि अशा प्रकारे तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. पण कोणालाही असे स्वातंत्र्य मिळत नाही. अशा प्रकारे फक्त भीक मिळते. म्हणून आपले आदर्श हुशारीने निवडा, असे कंगनाने म्हटले आहे.
याशिवाय कंगनाने पोस्ट केलेल्या दुसऱ्या इंस्टा स्टोरीत तिने लिहिले कि, गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना समर्थन दिले नाही. भगतसिंग यांच्या फाशीला गांधींचा पाठिंबा होता, असे बरेच पुरावे आहेत. यामुळे कोणाचे समर्थन करावे हे तुम्ही ठरवले पाहिजे. कारण या सर्व गोष्टी मनात ठेवून त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणे पुरेसे नाही. खरे तर हे मौन अतिशय बेजबाबदार आणि वरवरचे आहे. प्रत्येकाला त्यांचा इतिहास आणि आदर्शाबद्दल माहिती असणं आवश्यक आहे, असे कंगनाने म्हटले आहे.
Discussion about this post