हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवर गाजलेल्या रात्रीस खेळ चाले या मालिकेचे सध्या तिसरे पर्व सुरु असून याही पर्वाने चाहत्यांची पसंती मिळवली आहे. या मालिकेतील सर्वच पात्रे प्रेक्षकांची लाडकी असली तरीही अण्णा आणि शेवंताच्या जोडीचे चाहते काही औरच आहेत. मुख्य म्हणजे एका नजरेने घायाळ करणारी शेवंता हे पात्र साकारणाऱ्या अपूर्वा नेमळेकर हिने मालिकेतून अचानकच माघार घेतली आणि चाहत्यांना धक्का बसला. दरम्यान, एवढे लोकप्रिय झालेले पात्र आणि इतकी लोकप्रिय मालिका सोडण्यामागचे कारण काय असा प्रेक्षकांकडून वारंवार प्रश्न विचारला गेल्यानंतर अपूर्वाने इंस्टाग्रामवर पोस्ट करीत याचे कारण सांगितले. दरम्यान तिने चॅनेल, प्रोडक्शन आणि सहकलाकारांवर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना आता रात्रीस खेळ चाले मालिकेचे दिग्दर्शक राजू सावंत यांनी प्रत्युत्तर देत दुसऱ्या शेवंताबद्दल माहिती दिली आहे.
रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेचे सध्या सावंतवाडीजवळील आकेरी या गावात चित्रीकरण सुरु आहे. तर चित्रिकरणस्थळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मालिकेचे दिग्दर्शक राजू सावंत यांनी सांगितले की, रात्रीस खेळ चाले या मालिकेने आम्हा कलाकारांना एक कुटुंब मिळवून दिले. यामुळे शेवंताची भूमिका करणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही या मालिकेमधून बाहेर पडल्यानंतर आम्ही या भूमिकेसाठी तिच्याच तोडीच्या नव्या कलाकाराची निवड केली आहे. तसेच तीसुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल याची आम्हाला खात्री आहे, असे त्यांनी सांगितले.
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिच्या जागी कृतिका तुळसकर हिची शेवंताच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली असून आता रात्रीस खेळ चाले मालिकेला नवी शेवंता मिळाली आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेचे पहिले दोन पर्व प्रेक्षकांच्या अत्यंत पसंतीस उतरले होते. त्यातही दुसऱ्या हंगामातील अण्णा नाईक आणि शेवंता यांची केमेस्ट्री प्रेक्षकांना फारच आवडली होती. त्यामुळे मालिकेतील अण्णा नाईक आणि शेवंता या पात्राची एक वेगळी आकर्षकता मालिकेत तयार करण्यात आली. यानंतर मालिकेच्या तिसऱ्या हंगामात सर्व काही सुरळीत असताना अचानक अपूर्वाने एक्झिट केल्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला होता. म्हणून चाहते नाराज होऊ नये या कारणास्तव काही काळातच दिग्दर्शकांनी नव्या आणि तोडीच्या शेवंताचा शोध घेतला. आता हि नवी शेवंता प्रेक्षकांना किती आवडते हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
Discussion about this post