हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील सर्वांच्याच टेंशनवरची मात्रा अर्थातच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कॉमेडी शो गेली कित्येक वर्ष सर्वांचे खळखळून मनोरंजन करत आहे. या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा अभिनेता समीर चौघुले एकावेळी स्वतःच फार भावुक झाला. अर्थात कारणही तसंच काही होतं. गानसम्राज्ञी लता मंगेशकर अर्थात सर्वांच्या लाडक्या दीदींनी समीरला भेटवस्तू पाठवून त्याचे कौतुक केले आहे. यानंतर समीरने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त करीत त्याने मिळवलेल्या यशाच्या प्रत्येक सोबती संगतींचे आभार मानले आहेत.
या पोस्टमध्ये समीरने लिहिले, ”निसर्ग किती ग्रेट आहे ना! शब्द संपले की, भावनांना वाट मिळावी म्हणून त्याने अश्रूंची निर्मिती केली. आज ते प्रकर्षाने जाणवले. आज सुरांची आणि स्वरांची सरस्वती आदरणीय लतादीदींनी अत्यंत प्रेमाने घरी एक भेटवस्तू आणि माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ट्रॉफी पाठवली. ती ट्रॉफी म्हणजे दीदींच्या हस्ताक्षरातील शुभेच्छा आणि आशीर्वाद. थिजून जाणं म्हणजे काय ते आज मला कळलं.”
पुढे तो म्हणला, लतादीदी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ नेहमी बघतात आणि खूप हसतात, एन्जॉय करतात ही आम्हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कुटुंबीयांसाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. हा सुवर्ण क्षण आयुष्यात आला तो फक्त आणि फक्त आमच्या ‘हास्यजत्रा’ कुटुंबामुळे. अशा प्रकारे भावना व्यक्त करत त्याने सोनी मराठी, महाराष्ट्राची हास्यजत्रा, सोबतीतील कलाकार अशा संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. यात प्रामुख्याने अभिनेत्री विशाखा सुभेदारचे नाव घेत तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे असे म्हणत समीरने तिचे मनापासून आभार मानले आहेत. या पोस्टसोबत समीरने लतादीदींनी पाठविलेल्या शुभेच्छा पत्राचा फोटोसुद्धा शेअर केला आहे. यामध्ये लता दीदींनी स्वतः असे लिहिले आहे कि, ”लेखक, डायरेक्शन आणि सुंदर अभिनय! देवाची पूर्ण कृपा यालाच म्हणतात. माझ्या अनेक शुभेच्छा!”
Discussion about this post