हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एकापेक्षा एक चित्रपटांच्या माध्यमातून ज्याने मनमनाला घातला हात आणि चंदेरी दुनियावर ९०च्या काळात ज्याने केलं राज.. तो अभिनेता एकच.. लक्ष्मीकांत.. तो आला.. त्याने पाहिलं.. त्याने जिंकलं.. आणि … त्याच्या निधनानंतर एक कायमच आठवणीत राहणारं पर्व तिथेच थांबलं. अत्यंत लोकप्रिय चित्रपटांच्या माध्यमातून एक चेहरा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊन गेला.
हा चेहरा केवळ मराठी नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीही कमाल करत होता. नाटकाचा रंगमंच असो वा चंदेरी दुनियेचा कॅमेरा प्रत्येक रिलमध्ये लक्ष्या झळाळला.
मात्र एक काळ असा आला कि कोणालाही कल्पना नसताना त्याने जगाचा असा काही निरोप घेतला कि तो परतलाच नाही. त्याचा हा निरोप चित्रपटसृष्टीसाठी नुकसानदायी ठरला आणि चाहत्यांसाठी अतिशय वेदनादायी. हसरा चेहरा, अव्वल विनोदबुद्धी आणि मनाला भिडणारा अंदाज असं व्यक्तीमत्त्वं असणारा लक्ष्या १६ डिसेंबर २००४ साली काळाच्या पडद्याआड गेला. मात्र त्याची आठवण आजही तशीच जिवंत आहे.. जणू लक्ष्या कुठे गेलाच नाही. तो होता… तो आहे.. आणि तो कायम राहील.
आज लक्ष्याच्या निधनाला तब्बल १७ वर्षांचा काळ उलटून गेला आहे. मात्र त्याची लोकप्रियता आजही कायम आहे. लोक त्याला आणि त्याच्या कलाकृतींना कधीच विसरू शकत नाहीत. कारण लक्ष्या हा कायम जिवंत आहे. लहान असो वा वृद्ध लक्ष्या कधीच कुणाला परका नव्हता आणि म्हणून त्याची एक्झिट चटका लावून गेली.
लक्ष्मीकांत बेर्डे त्याच्या कलाकृतींसोबत खासगी आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत राहिला. साल १९९८ मध्ये लक्ष्याचा विवाह अभिनेत्री प्रिया अरुणशी झाला. या जोडीने चित्रपटाची स्क्रीन गाजवली आणि खऱ्या आयुष्यातही ते एकत्र आले. स्वानंदी आणि अभिनय अशा दोन मुलांना त्यांनी जन्म दिला आणि कुटुंबाची चौकट पूर्ण केली.
दरम्यान मराठी आणि हिंदी कलाजगत गाजवणारा हा हरहुन्नरी चेहरा किडनीच्या आजारामुळं मागे २ मुलं आणि पत्नीला सोडून कायमचा निघून गेला. यानंतर काही काळासाठी जणू सारं काही तिथेच थांबलं होतं. कुटुंबासाठी त्याचं जाणं मोठा आघात होता. पण, त्यातूनही सावरत आठवणींचा आधार घेत प्रियाने प्रवास सुरु ठेवला.
आपल्या मुलांना तिने एक वाट दाखवली आणि आजच्या घडीला लक्ष्याचा मुलगा अभिनय हा त्यांच्या कलेचा वारसा पुढे नेताना दिसत आहे.
लक्ष्याचा जन्म २६ ऑक्टोबर १९५४ रोजी मुंबईत झाला. त्याला ५ भावंडे होती. कौटुंबिक उत्पन्नात हातभार लावण्यासाठी लहानपणी त्याने लॉटरीची तिकिटे विकली. तेव्हा कुणाला माहित होतं कि हा लॉटरीवाला छोटू कल बडा आदमी बनेगा। गिरगावात गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांत नाटकात त्याचा सहभाग असल्यामुळे अभिनयाच्या ओढीस चालना मिळाली आणि चेंदेरी दुनियेला मिळाला चकाकता हिरा. ज्याच्या अंदाजाने प्रेक्षकांना कायमसाठी आपलंस केलं. धुमधडाका ने सुरुवात केली आणि एकापेक्षा एक जबरदस्त चित्रपटांची मालिकाच सुरु झाली.
भले आज आपल्यात लक्ष्या शरीररूपी नाही पण त्याची कलाकृती आणि आठवण निरंतर राहील… कारण पुन्हा लक्ष्या होणे नाही.
Discussion about this post