हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत आणि सुप्रसिद्ध अभिनेता चिन्मय उदगीरकर यांना सुविचार गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. नाशिकमधील अत्यंत मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. समाजाच्या विविध क्षेत्रात अविरतपणे काम करणाऱ्या व्यक्तींचा सुविचार मंचतर्फे दरवर्षी गौरव करण्यात येतो. यंदा कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पूजा सावंत आणि चिन्मय उदगीरकर यांनादेखील सुविचार गौरव विशेष पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
याशिवाय हेमंत राठी यांना जीवन गौरव पुरस्कार, तसेच कोरोना काळातील रुग्ण सेवेसाठी डॉ. अतुल वडगांवकर (वैद्यकीय), निवृत्त प्राचार्य मधुकर कडलग (शैक्षणिक), जेष्ठ साहित्यिक प्रा. शं. क. कापडणीस (साहित्य), नितीन महाजन (प्रशासन), महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातील खेळाडू ईश्वरी सावकार (क्रीडा), किशोर खैरनार (कृषी) यांनाही सुविचार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. रविवार, दिनांक २ जानेवारी रोजी सांयकाळी ४ वाजता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते नाशिक येथील रावसाहेब थोरात सभागृहात सुविचार गौरव पुरस्कार सोहळा पार पडेल. याबाबत माहिती संस्थेचे अध्यक्ष अॅड.अशोक खुटाडे व सचिव अॅड. रवींद्रनाना पगार यांनी दिली आहे. माहितीनुसार, या कार्यक्रमाला नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेयदेखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तर यावेळी कोविडच्या सर्व नियमांचे कठोर पालन केले जाईल, असे अध्यक्षांनी सांगितले.
सुविचार मंच हि संस्था गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकमध्ये मोठ्या पातळीवर कार्यरत आहे. सामाजिक असो वा सांस्कृतिक क्षेत्र हि संस्था आणि संस्थेतील सभासद मोठ्या उत्साहाने आणि निस्वार्थ भावनेने काम पार पडताना दिसतात. नाशिकमधील अनेक सामाजिक कार्यकर्ते, विविध मान्यवर या संस्थेचा एक भाग आहेत. अश्या मान्यवरांकडून आपापल्या क्षेत्रात उच्च कामगिरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी म्हणून सुविचार मंच दरवर्षी सुविचार गौरव पुरस्कार देते. सध्या या संस्थेचे अध्यक्षपद अॅड.अशोक खुटाडे व सचिव अॅड. रवींद्रनाना पगार भूषवित आहेत.
Discussion about this post