हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीला एक वेगळेच तेज देणाऱ्या पांडू चित्रपटाची वारी सुसाट चालू आहे. आता असे म्हणण्याचे कारण म्हणजे सलग ५० दिवस हा चित्रपट फक्त आणि फक्त हाऊसफुलच्या पाट्या लावतोय. एकेकाळी दादा कोंडके आणि अशोक सराफ यांनी गाजवलेला पांडू सध्या भालचंद्र कदम म्हणजेच भाऊ आणि कुशल बद्रिके गाजवताना दिसत आहेत. त्यामुळे पांडू आणि महादू हि जोडी तेव्हाही हिट होती आणि आजही हिट आहे. आता सलग ५० दिवस थिएटर गाजवणे आणि कमालीची लोकप्रियता मिळवणे हि बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यामुळे निर्माते विजू माने यांनी फेसबुक पोस्ट लिहून कलाकारांचे कौतुक केले आहे. तर प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
पांडू चित्रपटाचे निर्माते विजू माने यांनी आपल्या फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले कि, पांडूच्या पन्नासाव्या दिवसाच्या निमित्ताने…. कोरोना काळात लोकांना ओटीटी माध्यमांवर सिनेमे पाहण्याची सवय लागली. आता थिएटरला जाऊन सिनेमा कोण कशाला बघेल? सिनेमा बनवणाऱ्यांनी आता वेबसिरीजकडे वळायला हवं. मराठी शाळा मरताहेत तर मराठी सिनेमा कसा जिवंत राहील? फक्त महाराष्ट्रातच दीडशेहून अधिक सिंगल स्क्रीन थिएटर बंद असताना सिनेमा व्यवसाय कसा करणार? दाक्षिणात्य सिनेमात इतके भव्यदिव्य काहीतरी दाखवत असताना मराठी सिनेमा पाहायला लोक का जातील?
पुढे लिहिले कि, टेलिग्राम सारख्या माध्यमांवर पायरेटेड सिनेमा सहज मिळत असताना कोण पैसे खर्च करून थिएटरला जाऊन सिनेमा बघेल? मालिकांमध्ये रोज तेच ते चेहरे फुकट दिसत असताना विकत तिकीट घेऊन त्यांनाच पाहायला कोण जाईल? आणि याउपर ‘मराठी सिनेमा आला की चोपला’ अशा वृत्तीने फेसबुकवर मराठी सिनेमांवर शक्य तितकी उपहासात्मक आणि बोचरी टीका करणारे ‘मराठी सिनेमातज्ञ’ या सगळ्यांवर मात करत पन्नासाव्या दिवसापर्यंतचा थिएटर मधला प्रवास ज्या रसिक प्रेक्षकांनी नशिबी दिला त्या रसिकप्रेक्षकांना हे यश कृतज्ञतापूर्वक अर्पण. ‘पांडूच्या संपूर्ण टीमचा मला प्रचंड आणि रास्त अभिमान आहे. लव यू ऑल.
Discussion about this post