हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे नेहमीच विविध विषयांवर आपले मत परखडपणे मांडताना दिसतात. मुद्देसूद आणि मर्मावर बोट ठेवून बोलण्याची जणू त्यांना कला अवगत आहे. नुकतेच त्यांनी मालिकांच्या घसरत चाललेल्या दर्जावर भाष्य केलं आहे. यासोबत त्यांनी प्रेक्षकांनादेखील आवाहन केले आहे. ते म्हणाले कि, भिकार सीरियल पाहणं बंद करा. तुमचा वेळ वाया घालवू नका. तुम्ही पाहात नाही म्हटल्यावर तशा भिकार मालिका तयार होणार नाहीत आणि चांगलं काहीतरी तयार करतील. कल्याणच्या सुभेदार वाडा कट्टा आयोजित प्रा. रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत गोखलेंनी हे वक्तव्य केलं आहे.
दरम्यान बोलताना विक्रम गोखले म्हणाले कि, ‘प्रसारमाध्यमांमध्ये अनेक बदल गेल्या अनेक वर्षात झाले. लोककला मी पाहिल्या आहेत, त्याबद्दल मी फारसं वाचन केलेलं नाही. तरीही मला त्या सगळ्याबाबत आदर आहे. गेल्या अनेक वर्षांत प्रसारमाध्यमांमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. सगळं आता एका बटणावर येऊन पोहचलं आहे. अभिनयच फक्त बटणावर यायचा राहिला आहे. काही दिवसांनी कदाचित तोदेखील येईल. प्रेक्षकांना माझी विनंती आहे की आधी तुमचा जो चॉइस आहे त्यावर बंधनं घाला, तो तपासून पाहा. आपण काय पाहतोय? यामध्ये काही बुद्धीजीवी आहे का?, काही विचार आहे का? नाहीय तर मग कशासाठी तुम्ही तुमचा वेळ फुकट घालवत आहात. ज्याला कसला अर्थच नाहीय अशा मालिका, असले सिन्स आणि असे सगळे कलाविष्कार बघत रहाण्याने तुम्हाला काय मिळतं. तुम्हाला अंतर्मुख करणारा सिनेमा, नाटक, अभिनय असेल तर ते महत्वाचं आहे.’
पुढे म्हणाले, अखिल महाराष्ट्राला माझी नम्र विनंती आहे की आपण कुठल्या पद्धतीच्या मालिका बघतोय, टीव्हीवर काय बघतोय, त्यात काही तथ्य आहे का? की तथ्यहीन काही बघत रहायचं का? प्रसारमाध्यमं ही सध्या घरातील काम करत बघण्याची गोष्ट झालीय. ‘मीडिया हा कसाय माहितीय का? भाजी मोडता मोडता बघत रहाणे. पोराला खायला घालता घालता बघत रहाणे, घरकाम करताना बघत रहाणे. तुम्ही सिनेमागृहात केल्यानंतर असले चाळे, असले संवाद मारु शकत नाही. तिथे लोक म्हणतील आम्हाला सिनेमा बघायचा आहे, गप्प बसा किंवा बाहेर जा. तिथे ज्यापद्धतीची शांतता हवी असते तशी शांतता राखूया आपण हे बघताना. या लायकीच्या मालिका आहेत का इथे? काय बघतोय आपण? असेही प्रश्न त्यांनी विचारला आहे.
डिजिटलायझेशनमुळे मीडियाच नाही तर सगळ्याच क्षेत्रांमध्ये बदल झाले. मी त्याच्या विरोधात नाही. मात्र ते करत असताना आपण लोकांना काय देतो आहोत? किती वेळात देत आहोत? त्याला काही वजन आहे का? याचा विचार होत नाही. सामान्य माणसाच्या जगण्याशी संबंधित लेखक, दिग्दर्शक देऊ शकतात का? इच्छा आहे मात्र वेळ नाही. बारा तासांच्या शिफ्टमध्ये दीड एपिसोड काढला जातो. त्यामुळे ही रॅट रेस आहे असं विक्रम गोखले यांनी म्हटलं आहे.
Discussion about this post