हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नुकतेच प्रभाग जाहीर झाले आहेत. आता प्रत्येक उमेदवाराने निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. माहितीनुसार, ५८ प्रभागात एकूण १७३ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. दरम्यान यामध्ये एक चर्चा चांगलीच रंगली आहे. हि चर्चा पुण्यातल्या विद्यमान महापौर यांच्या प्रभाग क्रमांक ३३ बावधन खुर्द – महात्मा सोसायटी येथे सुरु आहे. कारण यंदा एक अनोखी लढत पाहायला मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हि लढत महापौर विरुद्ध अभिनेता अशी होऊ शकते. त्यामुळे सर्वांच्या नजर लागून राहिल्या आहेत.
महापौर मुरलीधर मोहोळ बावधन खुर्द-महात्मा सोसायटी (प्रभाग क्रमांक ३३) मधून लढण्याची शक्यता आहे. किमया हॉटेल (पौड फाटा, कर्वेरस्ता) ते भूगाव असा सुमारे २९ चौरस किलोमीटरच्या परिसरात हा प्रभाग पसरलेला आहे. मुख्य म्हणजे याच प्रभागात महापौरांच्या विरोधात मराठी चित्रपट सृष्टीतील एका अभिनेत्याने रिंगणात उतरायचे असे पक्के ठरवले असल्याची चर्चा जोरदार सुरु आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून मुळशी पॅटर्न, रेगे यासारख्या प्रसिद्ध चित्रपटातून घराघरात पोहचलेला आणि पिट्या भाई म्हणून परिचित असलेला मराठी अभिनेता रमेश परदेशी आहे.
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे राज्य उपाध्यक्ष पद भूषवणारे रमेश परदेशी आता मोठं रिंगण गाजवणार असल्याची शक्यता आहे. यादी त्यांनी पुण्यात लक्ष घालून मनसे पक्षाचे संघटन मजबूत केले. यानंतर “शाखा अध्यक्ष”हे पद रमेश परदेशींनी जेव्हा मागून घेतले तेव्हाच ते महानगरपालिका सभागृहात जाण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे यंदा या प्रभागातील भाग जाहीर होताच महापौर मुरलीधर मोहोळ विरुद्ध पिट्या भाई ही अनोखी लढत होवू शकते अशी चर्चा सुरु आहे.
मुळशी पॅटर्न या गाजलेल्या चित्रपटात पिट्या भाईची भूमिका साकारणारे अभिनेते “रमेश परदेशी” यांनी देऊळबंद, फत्तेशीकस्त, बेरीज वजाबाकी अशा आणखी काही चित्रपटातून महत्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. तर काही मालिका तसेच नाटकांतून त्यांनी आपल्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. यानंतर मनसे पक्षाचा एक भाग झाल्यानंतर राजकारणातही रमेश परदेशी सक्रिय झाले आणि आता थेट पालिका निवडणूक लढवणार असल्याची चर्चा जोरावर आहे.
Discussion about this post