हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे नुकतेच निधन झाल्याची दुःखद बातमी समोर येत आहे. दरम्यान ते ९३ वर्षाचे होते. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे रमेश देव यांचे निधन झाले असून या वृत्ताला त्यांच्या कुटुंबीयांनी दुजोरा दिला आहे. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याबद्दल मिळालेली माहिती रमेश देव यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी दिली आहे.
अभिनेते रमेश देव यांचा जन्म ३० जानेवारी १९२९ साली कोल्हापुर येथे झाला. लहानपणापासून अभिनयाची आवड असलेले रमेश यांनी आपल्या अभिनय शैलीच्या जोरावर आंधळा मागतो एक डोळा या चित्रपटातून चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. यानंतर त्यांनी मागे कधीच वळून पाहिलं नाही. उलट त्यांनी आरती चित्रपटातून बॉलिवुड इंडस्ट्रीमध्ये एंट्री केली. त्यांनी अभिनयासह, दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही नाव कमावलं आहे. त्यांनी अनेक मालिका आणि नाटकांचीदेखील निर्मिती केली आहे. त्यांना २०१३ साली ११ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिने इंडस्ट्री शोकात आहे. आज इंडस्ट्रीमधून आणखी एक असा तारा निखळला आहे ज्याच्या नसण्याची उणीव कधीच भरून निघणार नाही.
रमेश देव यांनी मराठीसोबत हिंदी भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये अव्वल भूमिका गाजवल्या आहेत. रमेश यांनी १९६२ सालामध्ये नलिनी सराफ (सीमा देव) यांच्याशी विवाह केला. त्यादेखील एक उत्तम अभिनेत्री आहेत. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र भूमिका साकारल्या. पाटलाचं पोर,सुवासिनी, झेप, सर्जा, या सुखांनो या, आनंद, कसौटी, फटाकडी, जय शिवशंकर, तीन बहुरानीयाँ हे त्यांचे गाजलेले चित्रपट ठरले आहेत. त्यांच्या अभिनयाचा वारसा त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव आजही पुढे नेत आहेत. तर दुसरा मुलगा अभिनव दिग्दर्शन क्षेत्रात कार्यरत आहे. पण चित्रपटसृष्टीला देव हरवल्याची जाणिव नेहमीच राहील. भावपूर्ण श्रद्धांजली!
Discussion about this post