हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक अमोल पालेकर यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. यामुळे त्यांना उपचारासाठी त्वरित पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ते ७७ वर्षांचे आहेत. माहितीनुसार, अमोल पालेकर यांना झालेल्या एका दीर्घ आजारावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीत आता किंचित सुधारणा होत असल्याची माहिती त्यांची पत्नी संध्या गोखले यांच्याकडून मिळत आहे. साधारण १० वर्षांपूर्वीदेखील अमोल यांची प्रकृती याच आजारामुळे खालावली होती आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
अमोल पालेकर यांची प्रकृती बिघडल्याचे समजताच त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यानंतर आता त्यांच्यावर उपचार सुरु होत असून तूर्तास तरी काळजी करण्यासारखं कोणतंही कारण नाही. अशी माहिती अमोल पालेकर यांची पत्नी संध्या गोखले यांनी माध्यमांना दिली आहे. अभिनेते अमोल पालेकर यांना अतिधुम्रपान करण्याच्या सवयीमुळे हा आजार झाल्याचे समजत आहे.
नेमक्या कोणत्या आजारामुळे त्यांच्यावर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली आहे हे अजून समजलेले नाही. मात्र १० वर्षांपूर्वी जी स्थिती निर्माण झाली होती आज पुन्हा एकदा तीच स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, आता त्यांच्यावर पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात आवश्यक ते उपचार सुरु आहेत.
ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी ७०-८० च्या दशकात सिनेसृष्टीत एक वेगळीच छाप पडली होती. तो संपूर्ण काळ त्यांनी गाजवला होता. हिंदीसोबतच अमोल पालेकर यांनी मराठी सिनेसृष्टीतही कमाल कामे केली आहेत. त्यांनी विविध छटा असलेल्या कमाल भूमिका केल्या आहेत. यात फक्त विनोदी भूमिकाच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकांचा समावेश आहे. प्रत्येक भूमिका ताकदीनं साकारणारा अभिनेता म्हणून अमोल पालेकर यांच्याकडे आजही पाहिलं जातं.
Discussion about this post