हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठमोळे अभिनेते सयाजी शिंदे हे निसर्गप्रेमी आहेत हे काही वेगळे सांगायला नको. त्यांनी नेहमीच वृक्ष संवर्धनासाठी आणि वृक्षारोपणासाठी पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. सयाजी शिंदे आणि मित्र परिवार यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या बीड मधील सह्याद्री देवराईला रविवारी दुपारी भीषण आग लागली होती. या आगीत साधारण दोन एकरमधील झाडांचे नुकसान झाले. तब्बल २ तास वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना देवराईत लागलेली आग विझवण्यासाठी वेळ लागला. एव्हाना अनेक निष्पाप सजीव झाडे निर्जीव झाली होती. हे सारं पाहून सयाजी याना आपल्या भावना अनावर झाल्या. यानंतर त्यांची पहिली भावनिक प्रतिक्रिया समोर आली आहे. यात त्यांनी चाहत्यांना एक भावनिक आवाहन देखील केले आहे.
अभिनेता आणि निसर्गप्रेमी सयाजी शिंदे यांनी हात जोडून आपले चाहते आणि इतर सर्व लोकांना कोणत्याही निसर्ग परिसराचे असे नुकसान होणार नाही याची कृपया काळजी घ्या अशी विनंती केली आहे. दरम्यान ते म्हणाले,”प्रयत्न करणं ही सर्वांची जबाबदारी आहे. ही एवढी मोठी जागा असते त्यात चुकून कोणीतरी आग लावतो. त्यांना हात जोडून विनंती आहे की असं करु नका. यामुळे संपूर्ण मानवजातीचं नुकसान होत आहे. शासनाने, ग्रामपंचायतीने आणि सर्वसामान्यांनीही प्रयत्न केले पाहिजेत. हे असं नुकसान होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे.
बीड जिल्ह्यातील पालवन गावाजवळ २५ एकर सह्याद्री देवराईचा मोठा परिसर आहे. या ठिकाणी सर्व देशी झाडांची लागवड मोठ्या संख्येत करण्यात आलेली आहे. या आगीत वड, पिंपळ आणि लिंबाचे झाड अशी विविध प्रकारची झाडे आहेत. या आगीत हि सर्व झाडे जळून खाक झाली. या आगीत तब्बल दोन एकरचा परिसर पूर्णपणे जळून खाक झाला आहे. सह्याद्री देवराईला आग लागल्याचे लक्षात येताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा अतोनात प्रयत्न केला. मात्र वाऱ्यामुळे आग वेगाने पसरली. यानंतर तब्बल दोन तासानंतर ही आग विझवण्यात यश मिळाले. मात्र अजूनही आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सयाजी शिंदे यांनी ‘सह्याद्री देवराई’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी विविध देवराई उभ्या केल्या आहेत. त्यांनी स्वतःला वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनात झोकून दिले आहे. माणसाला जगण्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन देण्याचे काम झाडेच करतात. ही बाब लक्षात घेत सयाजी शिंदे आणि त्यांची टीम झाडे लावण्याचे कार्य करते. या आधी कात्रज बोगद्याजवळील परिसरात लागलेली आग विझवण्यासाठी सयाजींची घेतलेली धडपड साऱ्यांनीच पाहिली होती. पण आज देवराई खाक झाल्यानंतर सायजींनी हात पाय गाळल्याचे दिसून आले.
Discussion about this post