हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच ‘झुंड’ या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक नागराज मंजुळें यांनी बॉलिवूड क्षेत्रात पदार्पण केले आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर सर्वत्र याच्या कथानकाची चर्चा जोरदार आहे. स्क्रिनिंगनंतर मोठमोठ्या कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शकांनी नागराज मंजुळे यांचे भरभरून कौतुक केले. इतकेच नव्हे तर हा चित्रपट पहा असे त्यांनी प्रेक्षकांना आवाहन केल्याचे दिसून आले. मात्र एक गट असाही आहे जे प्रत्यक्ष आणि अगदी अप्रत्यक्षपणे नागराज मंजुळे आणि त्यांच्या झुंड चित्रपटावर अर्वाच्य टीका करीत आहेत. सोशल मीडियावर याचे चित्र फार स्पष्ट दिसून आले. याबाबत आता नागराज मंजुळे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
नागराज मंजुळे यांनी एका वृत्त वहिनीला मुलाखत देताना झुंडवर होणाऱ्या ट्रोलिंगविषयी बोलताना म्हटले आहे कि, सोशल मीडियावरील टीकांना मी गांभीर्यानं घेत नाही. कारण सोशल मीडियाला डोकं नसतं, चेहरा नसतो. ते मला एका मशीनसारखं वाटतं. माझ्या चित्रपटाबद्दल खरंच काही तक्रार असेल तर त्यांनी माझ्यासमोर येऊन बोलावं. चित्रपटात काही चुका असतील आणि तुम्ही त्या मला प्रत्यक्षात येऊन सांगितलं तर मी माझे मुद्दे मांडू शकेन. मला जे काही सांगायचं होतं ते मी चित्रपटातून सांगितलं आहे. त्याला आता वेगळी पुरवणी जोडायची काय गरज आहे? शेवटी एकमेकांना समजून उमजूनच पुढे जावं लागणार आहे.
‘झुंड’ या चित्रपटाची कथा एक सत्यवादी घटना आहे. नागपुर येथील समाजसेवक विजय बारसे यांनी केलेल्या एका प्रयोगावर आणि त्या प्रयोगाच्या यशस्वीतेवर हि कथा आधारित आहे. बारसे यांनी झोपडपट्टीतील मुलांची आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारी फुटबॉल टीम तयार केली आणि ते यशस्वी देखील झाले. या चित्रपटातील बारसे यांची भूमिका महानायक अमिताभ बच्चन यांनी साकारली आहे. तर अन्य भूमिकांमध्ये छाया कदम, किशोर कदम यांच्यासारखे कसलेले कलाकार दिसत आहेत. तर अजय-अतुल यांच्या संगीताची योग्य जोड या चित्रपटाला लाभली आहे.
Discussion about this post