हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काश्मिरी पंडितांच्या जीवनावर आधारित आणि काश्मीर स्थलांतराचे सत्य उघड करणारा चित्रपट ‘ द काश्मीर फाईल्स’ हा ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक रंजन अग्निहोत्री यांनी केले आहे. या चित्रपटातील प्रत्येक घटना हा एक सत्य अनुभव आहे. कित्येकांनी जगलेला आणि जिवंत मृत्यू अनुभवलेल्या या घटनेचे भाष्य हा चित्रपट करतो. मात्र अनेक लोकांनी हा चित्रपट कथित आहे असे म्हटल्यामुळे चित्रपटाशी संबंधित कलाकार नाराज झाले आहेत. दरम्यान अभिनेत्री आणि निर्माती पल्लवी जोशी यांनी अशा लोकांना सडेतोड उत्तर दिले आहे.
अनेकांनी या चित्रपटाचे कौतुक केले तर अनेकांनी चित्रपटात दाखवलेल्या घडामोडी काल्पनिक आहेत असा आरोप केलाय. सन १९९० मध्ये काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवर जो अत्याचार झाला, तो पडद्यावर मांडल्याचा दावा अग्निहोत्री करत आहेत. मात्र यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात असल्यामुळे यात प्रोफेसरची भूमिका साकारलेली अभिनेत्री आणि निर्माती पल्लवी जोशी यांनी आता मौन सोडले आहे. विवेकने या चित्रपटाच्या संशोधनासाठी अनेक वर्षे मेहनत केली असून त्यांच्याकडे ४००० तासांचे रिसर्च व्हिडीओ आहेत असे पल्लवी यांनी लखनऊमधील पत्रकार परिषदेत सांगितले.
View this post on Instagram
अभिनेत्री आणि निर्माती पल्लवी जोशी म्हणाल्या कि, “आम्ही जगभरात फिरलो. यूएसए, यूके, जर्मनी, सिंगापूर, जम्मू आणि काश्मीर, पुणे, थायलंड, दिल्ली जिथे जिथे आम्हाला पीडितांचं पहिलं कुटुंब सापडलं, ज्यांच्या वडिलांची निर्घृण हत्या झाली, ज्यांच्या आईवर बलात्कार झाला, ज्या मुलांनी त्यांच्या डोळ्यांसमोर पालकांची हत्या होताना पाहिलं… आम्ही त्या लोकांना भेटलो आहोत. आम्ही त्यांच्या व्हिडिओ मुलाखती शूट केल्या आहेत आणि आमच्याकडे ते व्हिडिओ आहेत जे आम्ही लोकांसमोर आणू. त्यामुळे जर कोणी माझ्यावर चित्रपटात काहीतरी चुकीचं असल्याचा आरोप करत असेल, तर तुम्ही या आणि सर्व 4000 तासांचे ते रिसर्च व्हिडीओज पहा”, अशा शब्दांत पल्लवी जोशी यांनी उत्तर दिलं आहे.
Discussion about this post