हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। यंदाच्या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल 2022 (NYIFF) मध्ये जिओ स्टुडिओज निर्मित ‘गोदावरी‘ या मराठी चित्रपटाची ओपनिंग फिल्म म्हणून निवड झाली आहे. या निमित्ताने ‘गोदावरी’ चित्रपटाची सोशल मीडियाद्वारे घोषणा करण्यात आली. ब्ल्यू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित या चित्रपटात मराठी इंडस्ट्रीतील अभिनेता जितेंद्र जोशी स्वतः, सोबत विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने आणि प्रियदर्शन जाधव हे दिग्गज कलाकार आहेत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल महाजन यांनी केले आहे.
‘गोदावरी’ या चित्रपटाची कथा ही निशिकांत नामक एका व्यक्तीची आहे. तो आपल्या कुटुंबापासून दूर झाला आहे. मुळात अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी आणि कधीही न तुटलेली नाती सुधारण्यासाठी तो पुन्हा आपल्या घरी येतो. त्याच्या आयुष्यात निर्माण झालेल्या गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे त्याला ‘त्या’ नदीजवळ मिळणार आहेत, ज्या नदीचा त्याने इतकी वर्षं तिरस्कार केला आहे. अशा आशयानी अत्यंत लक्षवेधी अशी कथा या चित्रपटातून पाहायला मिळेल. या चित्रपटानं इफ्फी 2021 मध्येदेखील बाजी मारली आहे. तर जितेंद्र जोशीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ‘सिल्वर पिकॉक’ पुरस्कार आणि निखिल महाजन यांना विशेष ज्युरीचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार मिळाला आहे. तसेच पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2022 मध्येही ‘गोदावरी’ला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
‘गोदावरी’ चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक निखिल महाजन म्हणाले कि, ”न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘गोदावरी’ या चित्रपटाची ओपनिंग फिल्म म्हणून निवड झाल्याचा खूपच आनंद आहे. हा चित्रपट आम्ही खूप सकारात्मक हेतूनं बनवला आहे. महामारीच्या काळात केवळ सोळा दिवसांत या सिनेमाचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. माझ्यावर आणि माझ्या कामावर विश्वास ठेवल्याबद्दल मी जिओ स्टुडिओजचा खूप आभारी आहे. चित्रपट महोत्सवात ‘गोदावरी’ची निवड होणं म्हणजे माझ्या पुढच्या कामासाठी ही प्रेरणादायी बाब आहे.”
Discussion about this post