हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच २३ मार्च रोजी सर्वत्र शहीद दिनाच्या दिवशी देशाच्या सीमेवर आणि देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या जवानांचे स्मरण करण्यात आले. या दिवसाचे औचित्य साधून ‘भारत माझा देश आहे’ या पॅट्रिऑटिक चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या ६ मे २०२२ रोजी हा चित्रपट सर्वत्र राज्यातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. एबीसी क्रिएशन प्रस्तुत आणि डॉ.आशिष अग्रवाल निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन पांडुरंग कृष्णा जाधव यांनी केलं आहे. या चित्रपटाचे टिझर पोस्टर पाहता आणि शीर्षक वाचल्यानंतर कुणालाही हा चित्रपट देशभक्तीवर आधारित आहे हे समजून येत आहे. ‘अहिंसा परमो धर्म:’ अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसत आहे.
या चित्रपटाचे शीर्षक आणि टिझर हा देशभक्तीपर चित्रपट आहे असे सांगत आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटात झी मराठीवरील गाजलेली मालिका तुझ्यात जीव रंगला मध्ये ‘लाडू’ची भूमिका साकारणारा बाल कलाकार म्हणजेच राजविरसिंह राजे गायकवाड आणि स्त्री बाळ कलाकार देवांशी सावंत यांनी काम केले आहे. याशिवाय या चित्रपटात मंगेश देसाई, शशांक शेंडे, छाया कदम, हेमांगी कवी, नम्रता साळोखे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘भारत माझा देश आहे’ या चित्रपटाची कथा पांडुरंग कृष्णा जाधव यांनी लिहिली असून पटकथा, संवाद निशांत नाथाराम धापसे यांची आहे. तसेच चित्रपटातील गीते समीर सामंत लिखित आणि अश्विन श्रीनिवास यांचे संगीत लाभलेली आहेत. चित्रपटाचे संकलन निलेश गावंड यांनी केले आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक पांडुरंग कृष्णा जाधव हे चित्रपटाविषयी बोलताना म्हणाले कि, ‘हा एक देशभक्तीपर चित्रपट असला तरी त्याची कथा वेगळी आहे. मनाला स्तब्ध करणारा हा चित्रपट आहे. अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करायची होती. मात्र नुकत्याच झालेल्या शहीद दिनाच्या औचित्याने आम्ही ही तारीख जाहीर करत आहोत. कसलेले कलाकार असल्याने त्यांच्यासोबत काम करतानाही मजा आली. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट म्हणजे लहान मुलांसाठी पर्वणी आहे. प्रत्येक मुलाने पाहावा असा हा चित्रपट आहे.’
Discussion about this post