हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळापासून मनोरंजन विश्वाला काळा डाग लावणारे अनेक प्रकार घडून येत आहेत. यात प्रामुख्याने चित्रपट, मालिका वा वेब सीरिजमध्ये काम देतो सांगून फसवणूक केल्याच्या अनेक तक्रारींचा समावेश आहे. आता असाच एक प्रसंग ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील अभिनेत्रीवर ओढवला आहे. अभिनेत्री धनश्री भालेकरला वेब सीरिजमध्ये काम देतो असं सांगून तिच्याकडून २२ हजार ३६८ रुपये उकळण्यात आले होते. याप्रकरणी धनश्रीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर २ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर आता धनश्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून याबद्दल माहिती दिली होती. यानंतर आता पुन्हा एकदा तिने व्हिडीओ पोस्ट करीत म्हटले आहे कि, फसवणूक झालेल्या प्रकरणातील माझे सर्व पैसे मला परत मिळाले आहेत. सोबत तिने चाहत्यांना एक आवाहन केले आहे.
या व्हिडिओमध्ये धनश्री म्हणाली कि, “याच्याआधी एका व्हिडीओमध्ये मी माझ्यासोबत झालेल्या फसवणुकीबद्दल सांगितलं होतं. मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होतोय, की फसवणुकीत गेलेले माझे सगळे पैसे मला परत मिळाले आहेत. यासाठी मी पोलिसांचे आभार मानते. त्यांनी तपास करून माझे पैसे परत मिळवून देण्यासाठी मदत केली. तुम्हा सर्वांचेही खूप आभार, कारण तुम्हीसुद्धा माझी खूप साथ दिली. यानिमित्ताने मला तुम्हाला सांगायचं आहे की जर कोणी तुमची फसवणूक करत असेल तर त्याविरोधात आवाज उठवा.
पुढे, आपणच पहिलं पाऊल उचललं नाही तर हे शक्य होत नाही. समाजात असे बरेच लोक आहेत, जे आपली मदत करतील. त्यामुळे कृपया तुमच्यासोबत अशी कोणती फसवणूक झाली असेल किंवा होत असेल तर त्याविरोधात तक्रार दाखल करा. आणि सर्वांत आधी हे होऊ नये यासाठी काळजी घ्या. आपण जर तक्रार केली नाही तर फसवणूक करणाऱ्यांचंही तितकंच फावतं. त्यामुळे त्यांना अद्दल घडवणं महत्त्वाचं आहे. आपल्याला असंच वाटतं की एकदा फसवणूक झाली की पैसे परत मिळत नाही, पण असं नसतं. हे पैसे परत मिळू शकतात, पण त्यासाठी तुम्ही पहिलं पाऊल उचलणं गरजेचं आहे,” असा संदेश तिने नेटकऱ्यांना दिला आहे.
त्याच झालं असं कि, डिसेंबर २०२१ रोजी धनश्रीला नामांकित निर्मिती कंपनीच्या नावाने नवीन वेबसिरीज साठी निवड झाल्याचे सांगून फसवुणकीला सुरुवात झाली. अनिकेत नामक दिग्दर्शक आणि शिव नामक कार्यकारी निर्माता असे भासवीत दोघांनी तिची फसवणूक केली होती. नामांकित कंपनीच्या नावामुळे धनश्रीने काम करण्यास होणार दिला आणि इथेच ती फसली. काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तिला हैदराबादच्या ऑफिसला बोलावण्यात आले. दरम्यान धनश्रीकडून विमानाच्या तिकिटाची नोंद होत नव्हती यासाठी तिला एक क्रमांक देऊन त्यावर पैसे भरण्यास सांगितले. तिने तिकिटाचे २२ हजार ३६८ रुपये भरल्यानंतर तिला तिकिट मिळाले नाहीच शिवाय त्या दोन व्यक्तींनी तिच्याशी संपर्क तोडला. यामुळे आपण फसवले गेल्याचे तिला समजले आणि तिने कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
Discussion about this post