हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। श्वास रोखून धरायला लावणारं रहस्य आणि त्यासह वेगवान घटनाक्रम, कूटनीती, चपळ बुद्धी आणि धाडसाच्या जोरावर तब्बल ७२ तास चाललेला रोमांचक अद्भुत थरार स्टोरीटेलवर अनुभवा. मुरलीधर खैरनार लिखित ‘शोध’ या थरारक कादंबरीतून अभिनेते उपेंद्र लिमये आणि अभिनेत्री केतकी थत्ते आपल्या दमदार आवाजात खास कथा घेऊन आले आहेत. ही गोष्ट १६७० साली शिवरायांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली तेव्हा सुरु होते. पण सुरतेहून स्वराज्यात परत येताना या लुटीतला प्रचंड ऐवज हरपला! तो खजिना कुठे गेला? हे सांगणारा निरोप महाराजांना देणारा गोंदाजी. मुघलांच्या ताब्यात सापडल्यानंतर त्याचा झालेला गूढ मृत्यू. खलिता, सांकेतिक भाषा याविषयी हि कथा भाष्य करते. त्यामुळे हि कथा रोमांचक आणि थरारक अनुभव देणारी आहे यात काही वादच नाही.
अभिनेता उपेंद्र लिमये या कादंबरी विषयी बोलताना म्हणाले कि, “किशोर कदम, सचिन खेडेकर, सयाजी शिंदे असे काही माझे समविचारी मित्र जेव्हा आम्ही एखादं नवं काही ऐकतात, वाचतात तेव्हा लगेच एकमेकांना सांगतो, सुचवतो. त्या संदर्भानुसार मी ही मुरलीधर खैरनारांची अफलातून कादंबरी वाचली. सलग दीड दोन दिवसात मी ती पूर्ण केली, तिने मला झपाटून टाकल. अश्या काही मोजक्या कादंबऱ्या असतात त्यातलीच ही एक खूप दुर्मिळ कादंबरी आहे, जी तुमची झोप उडवते आणि तुम्हाला गुंतवून ठेवते. अतिशय सकस कथाबीज आणि सुबक मांडणीमुळे स्टोरीटेलवर ऑडिओ रूपात सादर करताना जसा मी भारावून गेलो तसंच तुम्ही ऐकताना गुंतून जाणार हे नक्की”.
तर अभिनेत्री केतकी थत्ते म्हणाल्या “मीही ही कादंबरी अहोरात्र सलग तीन दिवसात वाचून काढली. एकदा हातात धरली कि संपल्याशिवाय चैन पडत नाही. आपण तहान भूक सगळं हरपून कादंबरीत गुंतून जातो. लेखक मुरलीधर खैरनार यांच्या लेखणीची ही किमया आहे. या शोधाच्या मोहिमेतील आपणही एक होतो आणि त्यातील पात्रांसोबत वावरू लागतो. स्टोरीटेल कादंबऱ्यांची निवड युनिव्हर्सल विचार करून करते. सर्वांनी नक्की ऐकावी अशी अप्रतिम कलाकृती”
Discussion about this post