हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपटांची दर्जेदार कामगिरी पहायला मिळत आहे. मराठी चित्रपटांसाठी प्रेक्षकही चांगला प्रतिसाद देताना दिसतात. त्यामुळे वेगळी कथा आणि मनोरंजनाचा ध्यास घेऊन निर्माते नवनवीन प्रोजेक्ट घेऊन येत असतात. आजकाल थिएटरइतकेच ओटीटी प्लॅटफॉर्म देखील जबरदस्त चालताना दिसत आहेत. अशावेळी नवीन प्रोजेक्ट घेऊन येण्याबाबतीत ओटीटी कसं काय मागे राहणार..? त्यामुळे प्लॅनेट मराठी ओटीटी लवकरच नात्यांची गोष्ट सांगणारा नवा कोरा चित्रपट घेऊन येत आहे. ज्याचे नाव आहे ‘एका हाताचे अंतर’.
View this post on Instagram
अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी प्रकाश कुंटे दिग्दर्शित ‘एका हाताचं अंतर’ हा चित्रपट लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाची अलीकडेच घोषणा करण्यात आली आहे आणि त्याचा मुहूर्त सोहळाही संपन्न झाला आहे. या चित्रपटात गौरी नलावडे, अभिजीत खांडकेकर, नेहा जोशी, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, रेशम श्रीवर्धनकर हे कलाकार दिसणार आहेत. ‘एका हाताचं अंतर’ या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण पाँडीचेरीमध्ये होणार आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक प्रकाश कुंटे म्हणाले कि, “प्लॅनेट मराठी सोबतचा हा माझा पहिला चित्रपट आहे. तर काही कलाकारांसोबतही मी पहिल्यांदाच काम करत आहे. हे सगळेच कलाकार कमाल आहेत. या चित्रपटाबद्दल सांगायचे तर ही एक प्रेमकहाणी असून कुटूंबासोबत पाहावा असा हा चित्रपट आहे. नात्यातील विविध पैलू यात पाहायला मिळणार आहेत.”
तर ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणाले कि, “प्रकाश कुंटे हे अतिशय उत्कृष्ट आणि संवेदनशील दिग्दर्शक आहेत. त्यांनी सिनेसृष्टीला नेहमीच वेगळे विषय दिले आहेत. लवकरच एक नवीन विषय घेऊन आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहोत. यापूर्वी आम्ही ‘पाँडीचेरी’ हा चित्रपट केला ज्याचे संपूर्ण चित्रीकरण पाँडीचेरीमध्ये केले होते. आता ‘एका हाताचं अंतर’ या चित्रपटाचे चित्रीकरणही पाँडीचेरीमध्ये होणार आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीला आता एक नवीन चित्रीकरणस्थळ मिळाले आहे. या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीही महाराष्ट्राबाहेर आपला ठसा उमटवू पाहात आहे.”
Discussion about this post