हॅलो बॉलिवुड ऑनलाईन। दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित आणि मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर अभिनित ‘शेर शिवराज’ हा चित्रपट घोषित झाल्यापासुन चर्चेत आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध कसा केला हे पहायला मिळणार आहे. शिवचरित्रातील ‘अफझलखान वध’ हा शिवकालीन इतिहासाचा एक महत्वपूर्ण अध्याय असून शिव अष्टकातील हे चौथे पुष्प आहे.
आता या चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे. महाराजांची गळाभेट, अफजलखानाचा फसलेला कपटी डाव आणि त्यानंतर महाराजांनी खानाचा बाहेर काढलेला कोथळा या इतिहासाचे पान या चित्रपटात उलघडत आहे.
साधारण २ मिनिटे ३१ सेकंदांचा हा ट्रेलर इतका दमदार आहे कि पाहताच अंगावर शहारा येईल. या चित्रपटाच्या ट्रेलर अनावरण सोहळया दरम्यान अफजलखानाचा कपटी डाव महाराजांनी आपल्या तल्लख बुद्धिमत्तेने कसा त्याच्यावरच उलटवला याची छोटीशी झलक रंगमंचावर सादर करण्यात आली. हा थरार अनेक उपस्थितांनी डोळ्यासमोर अनुभवला. ‘शेर शिवराज’ या चित्रपटात अफजलखानाची भूमिका कोण साकारणार हे या रंगमंचाचा पडदा उघडताच सर्वाना समजले. बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते मुकेश ऋषी यांनी अफजलखानाची आव्हानात्मक भूमिका यामध्ये साकारली आहे.
‘शेर शिवराज ‘ हा चित्रपट २२ एप्रिल २०२२ रोजी रुपेरी पडदयावर प्रदर्शित होणार आहे. ‘शेर शिवराज’ या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर याने छत्रपती शिवाजी महाराज यांनी भूमिका साकारली आहे. तर बलाढ्य अफजलखानाच्या रुपात मुकेश ऋषी त्यांच्यासोबत मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर, वर्षा उसगांवकर, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, आस्ताद काळे, वैभव मांगले, सुश्रुत मंकणी, दीप्ती केतकर, माधवी निमकर,ईशा केसकर, रिशी सक्सेना, अशी कलाकारांची तगडी फौज पहायला मिळणार आहे.
Discussion about this post