हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय रिएलिटी शो ‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या नवव्या सीजनचा महाअंतिम फेरीचा सोहळा नुकताच पार पडला. या अंतिम फेरीत विजेतेपदासाठी तब्बल ७ स्पर्धकांमध्ये चुरशीचा सामना रंगला होता. यात जयपूरचा बीट बॉक्सर दिव्यांश आणि भरतपूरचा बासरीवादक मनुराज यांनी बाजी मारत विजेतेपद आपल्या नावे केले आहे. यामुळे इंडियाज गॉट टॅलेंटच्या नवव्या सिजनला विजेता मिळालेला आहे. त्यांना २० लाख रुपये आणि आलिशान कार देऊन गौरविण्यात आले आहे. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपापला आनंद व्यक्त केला आहे.
इंडियाज गॉट टॅलेन्टचे विजेतेपद जिंकल्यावर दिव्यांशने एका माध्यमाशी बोलताना सांगितले की, “हे क्रांतिकारी आहे. मला असे वाटते की आता सर्व वादक, मग ते बीटबॉक्सर असोत, सितार वादक असोत किंवा वाद्यवादक असोत, ते चर्चेत येतील आणि त्यांची स्वप्नेही पूर्ण होतील असा विश्वास वाटतो.” त्याचा साथीदार मनुराजने सांगितले की, त्याला वाटते की तो आनंदाच्या शिखरावर पोहोचला आहे.
शिवाय दिव्यांशसोबत सहयोग हा नशिबाचा खेळ असा होता की आता आम्ही जिथे भेटलो त्या शोचे विजेते झालो आहोत. आमचा विजय हा देशातील सर्व वादकांचा विजय आहे जे अजूनही पार्श्वभूमीत आहेत. आता पुढे येण्याची आणि तुमच्या प्रतिभेची ओळख होण्याची वेळ आली आहे. कारण भारतीय संगीत उद्योग बदलासाठी तयार आहे आणि भरभराट करत आहे. हा विजय म्हणजे संगीतकारांना त्यांचा आवाज शोधण्यासाठी आणि त्याचा सर्वोत्तम वापर करण्याचे आमंत्रण आहे.
दरम्यान जबलपूरची इशिता विश्वकर्मा आणि दिल्लीचे बॉम्ब फायर स्क्वॉड हे शोचे उपविजेते ठरले. इंडियाज गॉट टॅलेंटच्या नवव्या सिजनसाठी शिल्पा शेट्टी, किरण खेर, बादशहा आणि मनोज मुंतशीर हे परीक्षक म्हणून काम पाहत होते. तर डोळे दिपवून टाकणा-या या महाअंतिम फेरीमध्ये ‘हीरोपंती- २’ चित्रपटातील टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि नवाजुद्दीन सिद्दीकी या कलाकारांनी हजेरी लावली होती.
Discussion about this post