हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हलपासून, सिल्वर पिकॉक ते अगदी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पर्यंत ‘गोदावरी’ या चित्रपटाने अनेक नामांकनांमध्ये बाजी मारल्याचे पाहायला मिळाले आहे. हा चित्रपटात अतिशय मार्मिक अशा कथेवर आधारित असून यामध्ये मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता जितेंद्र जोशी मुख्य भूमिकेत आहे. अनेक पुरस्कारानंतर आणि IMDb च्या टॉप १० रेटिंगनंतर आता या चित्रपटाने ‘FIPRESCI-India’ च्या टॉप १०’ मध्ये मानांकन मिळवले आहे. याबाबतची माहिती अभिनेता आणि दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
अभिनेता प्रियदर्शन जाधव याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया फेसबुकच्या माध्यमातून पोस्ट शेअर करीत हि बातमी आपल्या चाहत्यांसह शेअर केली आहे. त्याने फेसबुकवर पोस्ट करताना लिहिले आहे कि, ‘आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची आणि सन्मानाची बातमी!! सन २०२१ च्या प्रतिष्ठित ‘FIPRESCI-India’ च्या पहिल्या १० भारतीय चित्रपटांच्या यादीत ‘गोदावरी’ ला मानांकन!. या पोस्टसह त्याने गोदावरीचे पोस्टर देखील शेअर केले आहे. हि बातमी शेअर करताना प्रियदर्शन आणि गोदावरी टीमचा आनंद गगनात मावेनासा झाला असेल याबाबत कोणतेच आश्चर्य नाही.
‘गोदावरी’ या चित्रपटाची कथा ही निशिकांत नामक एका व्यक्तीची आहे. तो आपल्या कुटुंबापासून दूर झाला आहे. मुळात अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी आणि कधीही न तुटलेली नाती सुधारण्यासाठी तो पुन्हा आपल्या घरी येतो. त्याच्या आयुष्यात निर्माण झालेल्या गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे त्याला ‘त्या’ नदीजवळ मिळणार आहेत, ज्या नदीचा त्याने इतकी वर्षं तिरस्कार केला आहे.
अशा आशयाने अत्यंत लक्षवेधी अशी कथा या चित्रपटातून पहायला मिळेल. या चित्रपटाने आतापर्यंत इफ्फी 2021 मध्ये बाजी मारली आहे. तर जितेंद्र जोशीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ‘सिल्वर पिकॉक’ पुरस्कार आणि निखिल महाजन यांना विशेष ज्युरीचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार मिळाला आहे. तसेच पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2022 मध्येही ‘गोदावरी’ला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
Discussion about this post