हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला आगामी मराठी चित्रपट ‘समरेणू’ १३ मे २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच याचा टिझर प्रदर्शित झाला होता. यानंतर काही दिवसांपूर्वी चित्रपटातील मुख्य भूमिका सम्या, रेणू आणि संत्या कोण निभावणार हे प्रेक्षकांसमोर आले होते. शिवाय चित्रपटाचे शीर्षक गीत देखील चांगलेच गाजताना दिसत असताना आता याच चित्रपटातील आणखी एक प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. या प्रेमगीतांचे शीर्षक ‘झिम्माड’ असे आहे. या गाण्याला प्रदर्शनापासूनच प्रेक्षकांची चांगली वाहवाह मिळत आहे. या चित्रपटामध्ये सम्या आणि रेणूची प्रेमकहाणी पहायला मिळणार आहे. पण कोणतीही गोष्ट खलनायकाशिवाय पूर्ण कशी होईल..? हा चित्रपट एक अनोखी कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येतो आहे.
‘सुरवात महत्वाची नाय, शेवट महत्वाचाय.. अशी हटके टॅगलाईन असलेला हा चित्रपट आधीपासूनच चर्चेत आहे. त्यात आता महेश डोंगरे लिखित, दिग्दर्शित ‘समरेणू’ चित्रपटातील ‘झिम्माड’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला कुणाल गांजावाला आणि निती मोहन यांचा मधुर आवाज लाभला आणि क्षितीज पटवर्धन यांचे अर्थपूर्ण शब्द तसेच सूरज – धीरज यांचे संगीत लाभले आहे. या गाण्यामध्ये सम्या- रेणू नजरेने एकमेकांप्रती असलेले आपले प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. आपल्या जोडीदाराची प्रत्येक क्षणी मिळणारी साथ अत्यंत मोलाची असते अशी भावना व्यक्त करणारे हे गाणे प्रेक्षकांना आवडत आहे. या गाण्यात नवरा- बायको आणि एक गोड बाळ दिसत आहे.
याबाबत ‘समरेणू’ चित्रपटाचे दिग्दर्शक महेश डोंगरे म्हणाले कि, ‘समरेणू’ चित्रपटातील गाणी प्रेक्षकांना आवडत आहेत. जसे प्रेक्षक गाण्यांना उदंड प्रतिसाद देत आहेत तसाच प्रतिसाद चित्रपटाला देतील याची मला खात्री आहे. या गाण्यात चित्रपटाची कथा एका वेगळ्या वळणावर गेल्याचे दिसते. त्यामुळे चित्रपटात एक वेगळीच प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे याची तुम्हाला खात्री होईल. एक दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून या चित्रपटातून मी पदार्पण करत आहे. त्यामुळे ‘समरेणू’ माझ्यासाठी खूप खास आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मला खूप काही नवीन शिकायला मिळाले.”
Discussion about this post