हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ठाण्याचा वाघ अशी ओळख असणारे आणि लोकांसाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची करताना एकदाही मागे पुढे न पाहणारे दमदार व्यक्तिमत्व लोकनेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रदर्शनास सज्ज झाला आहे. या चित्रपटाचे नाव ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे असे आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि प्रसाद ओक अभिनित हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनापेक्षा भावनेशी नाळ जोडणारा ठरणार आहे. यामध्ये अभिनेता प्रसाद ओक हा आनंद दिघेंच्या भूमिकेत दिसतोय. चित्रपटाचा टीझर आणि म्युझिक लॉँचदरम्यान प्रसादचा लूक समोर आला. जो हुबेहूब आनंद दिघेंसारखाच भासत होता. यामुळे आपल्या या भूमिकेविषयी प्रसाददेखील व्यक्त झाला आहे. ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट येत्या १३ मे २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.
आनंद दिघेंच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता प्रसाद ओक याने एका माध्यमाला मुलाखत देताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी तो म्हणाला कि, “आम्हाला कळलंच नाही की तू आहेस, आम्हाला असं वाटलं की साहेबच पुन्हा अवतरले, इतका हुबेहूब.. अशा जनसामान्यांकडून प्रतिक्रिया आल्याच पण त्यांच्या कुटुंबीयांकडून, शिंदे साहेबांकडून सकारात्मक प्रतिक्रिया आल्या. आमच्या संपूर्ण टीमने जे कष्ट घेतले, त्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटलं. मी ५५ दिवसांच्या शूटिंगमध्ये दररोज प्रविणला विचारत होतो की, बरोबर चाललंय ना? दिघेसाहेबांची जी प्रतिमा समाजामध्ये आजही आहे, त्यांना जाऊन २१ वर्षे झाली, पण २१ वर्षांनंतरही तीच लोक आणि त्यांच्याही पुढील पिढ्या ज्या पद्धतीने त्यांच्यासाठी वेडे आहेत, त्यांचे भक्त आहेत, शिष्य आहेत, त्या भावनेला जरासुद्धा धक्का लागेल असं काहीही करून चालणार नव्हतं. त्यामुळे प्रचंड मोठी अशी जबाबदारी आमच्या खांद्यावर होती. पण ती प्रवीणच्या मदतीने मला पेलता आली,”
पुढे म्हणाला कि, “प्रत्येक कलाकाराला असं वाटत असतं की आपल्या वाट्याला एक चांगली भूमिका यावी आणि तसा बहुतेक मी बरा अभिनेता आहे. एक मोठा रोल माझ्या आयुष्यात मला मिळायचा बाकी आहे, असं मला खूप वर्षांपासून आतल्या आत वाटत होतं. मग २०१५ -१६’ला कच्चा लिंबू आला. यानंतर माझी ६ वर्षे माझ्या ३ वेगवेगळ्या चित्रपटांसाठी गेली. यानंतर लोकांना असं वाटायला लागलं होत की, मी अॅक्टिंग सोडली. आता मी फक्त दिग्दर्शनच करणार आहे. पण हा खूप म्हणजे खूपच मोठा गैरसमज या चित्रपटाच्या निमित्ताने पुसला जाईल असं मला वाटत. या भूमिकेसाठी मी खरंच खूप आभारी आहे आणि भरून पावल्यासारखं वाटतंय.
Discussion about this post