हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील चौथा चित्रपट ‘शेर शिवराज’ हा नुकताच २२ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित झाला आहे. दरम्यान या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून आता त्याचे शो वाढवण्या आले आहेत. अशातच चित्रपट पाहणाऱ्यांकडून चित्रपटाचा शेवट सीन लीक करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर याने चाहत्यांना आणि चित्रपट पाहायला येणाऱ्यांना कळकळीची विनंती केली आहे. चिन्मयने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना अभिनेता चिन्मय मांडलेकर म्हणाला कि, “तुम्ही या चित्रपटावर पहिल्या दिवसापासून, पहिल्या शोपासून जे भरभरून आणि तुडुंब प्रेम करताय ते आमच्यापर्यंत पोहोचतंच आहे. फक्त तुम्हा सर्वांना एक अत्यंत नम्र आणि कळकळीची विनंती करतो की चित्रपट पाहत असताना चित्रपटाचा शेवट मोबाईलवर शूट करून तो सोशल मीडियावर शेअर करू नका. आपले इतर मित्र जे हा चित्रपट नंतर बघणार आहेत, त्यांना तो थरार चित्रपटगृहात तसाच अनुभवू द्या, जसा तुम्ही अनुभवलात. माझी खात्री आहे की, माझ्या या विनंतीला तुम्ही नक्की मान द्याल.”
त्याच झालं असं कि, अनेकांनी शेर शिवराजच्या क्लायमॅक्सचा संपूर्ण व्हिडीओ हा आपल्या मोबाईल कॅमेराच्या माध्यमातून शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केला. यामुळे क्लायमॅक्सची मज्जाच राहिली नाही. अनेकांनी तोच व्हिडीओ आणखी व्हायरल केल्यामुळे चित्रपटातील उजवी बाजू निकामी होते का काय अशी भीती निर्मात्यांना आणि कलाकारांना जाणवली.
मात्र क्लायमॅक्सचा सीन अशा पद्धतीने लीक होऊ नये म्हणून चिन्मय मांडलेकरने ही विनंती केली आहे. चिन्मयच्या या व्हिडीओवर सध्या अनेक प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘सॉरी सर मी स्टोरीमध्ये शेवटचा सीन अपलोड केला होता. मला माझी चूक लक्षात आली आता स्टोरी डिलिट करतो, असं एकाने म्हटलं आणि चूक मान्य केली. तर अनेकांनी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊनच पाहणार असे म्हटले आहे.
Discussion about this post