हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे अलीकडेच शिव अष्टकातील तिसरा चित्रपट ‘शेर शिवराज’ प्रदर्शित झाल्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. पण यावेळी त्यांच्यावरील चर्चेचे कारण काही औरच आहे. अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लांजेकरांवर तीव्र नाराजी व्यक्त करीत संताप दर्शविला आहे. दिग्पाल यांच्या सोशल मीडियावरील एका पोस्टवर त्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून अमोल कोल्हेंनी घडलेल्या अप्रिय प्रकाराची माहिती दिली आहे. सोबतच लिहिलेल्या कॅप्शनमधून आशय सांगितला आहे. यानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी जाहीर माफीसुद्धा मागितली आहे तर हे प्रकरण नेमकं काय आहे..? हे आपण जाणून घेऊया.
अमोल कोल्हे यांनी पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले कि, ‘आजवर प्रत्येकवेळी छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना मी कायमच त्या थोर व्यक्तिरेखांना नतमस्तक होत प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तसेच प्रत्येकाच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मान ठेवून इतरांच्या सादरीकरणावर कधीही भाष्य केले नाही उलट कौतुकच केले. असे असताना ‘अशा’ प्रकारची पोस्ट लिहिणाऱ्यांचे व ती शेअर करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार, असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
अभिनेता अमोल कोल्हे म्हणाले कि, ‘२ ते ३ दिवसांपूर्वी एका दिग्दर्शकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यात त्यांचा हेतू सिनेमाचं प्रमोशन करणं असेल. पण माझा त्या कलाकृतीशी काहीही संबंध नसताना अप्रत्यक्षरित्या त्या पोस्टमध्ये माझा उल्लेख झाला. हा उल्लेख आक्षेपार्ह पद्धतीने करण्यात आला. यामुळे मला हा व्हिडीओ पोस्ट करणं गरजेचं वाटतं. अनेकदा अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केलं पाहिजे असं म्हटलं जातं, पण वारंवार जेव्हा एक गोष्ट घडते तेव्हा ते खोटे आरोपही खरे वाटू लागतात. मी आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज किंवा शंभूराजे म्हणा ज्या ऐतिहासिक भूमिका साकारल्या आहेत, त्या पूर्णपणे नतमस्तक होऊन साकारल्या आहेत. असं असताना अशा पद्धतीच्या पोस्ट लिहून त्या शेअर करून माझी रेषा मोठी हे दाखवण्यासाठी दुसऱ्याची रेषा पुसून टाकण्याचा जो विखारी प्रयत्न सुरू आहे, तो दुर्दैवी आहे आणि ही माझी संस्कृती नाही. मी कोणाचाही विरोध किंवा निषेध करत नाही. त्यामुळे ही पोस्ट लिहिणाऱ्यांचे आणि ती शेअर करणाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो’
अमोल कोल्हेंच्या नाराजीचे दर्शन घडविणाऱ्या या पोस्टनंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत त्यांची जाहीर माफी मागितली आहे. यात ते म्हणाले आहेत कि, ‘चित्रपटाचं कौतुक करणाऱ्या पोस्ट अनेक चाहते शेअर करत होते. अशातच आमच्या सोशल मीडिया टीमकडून ही पोस्ट अनावधानाने शेअर झाली. मात्र संबंधित मुद्दा लक्षात आल्यानंतर आम्ही ती पोस्ट डिलिट केली०. डॉ. अमोल कोल्हे यांचा अपमान करण्याचा हेतू किंवा त्यांच्याबद्दल आमच्या मनात कोणताही आकस नाही. हे जाणीवपूर्वक केलेलं नाही. पण तरीही मी त्यांची माफी मागतो’
त्याच झालं असं कि, ‘शेर शिवराज’ या चित्रपटासाठी दिग्दर्शक म्हणून दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यात शेर शिवराजची स्तुती करणारे अनेक मुद्दे होते. मात्र एका मुद्द्यात असं लिहिलं होतं कि, ‘टीव्हीच्या पडद्याआड शिवराय आणि शंभूराजे म्हणजे मीच अशी कोल्हेकुई बंद करून शेर शिवराज हे असे असतात हे सिद्ध करणारा चिन्मय मांडलेकरांचा जबरदस्त अभिनय असलेला सिनेमा’. या पोस्टवर अमोल कोल्हे यांनी आक्षेप घेत आपली नाराजी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून व्यक्त केली आहे.
Discussion about this post