हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने अगदी काहीच दिवसांपूर्वी आपला आगामी चित्रपट ‘तमाशा लाईव्ह’चे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते. हे पोस्टर चांगलेच चर्चेत होते. तिचा लूक आणि ब्लॅक अँड व्हाईट पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. यानंतर आता या चित्रपटातील पहिले गाणे ‘चित्रपटाची नांदी; हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. यामध्ये सिने सृष्टीतील तंत्रज्ञांच्या कलेचा आणि त्यांनी दिलेल्या वारस्याला टीम तमाशा लाईव्ह कडून मानाचा मुजरा करण्यात आला आहे. दरम्यान या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या २४ जून २०२२ रोजी चित्रपटगृहात ‘तमाशा लाईव्ह’ प्रदर्शित होणार आहे.
हे गाणे अतिशय भव्य स्वरूपाचे आहे. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जयंतीनिमित्त औचित्य साधून हे गाणे कर्जत येथील एन डी स्टुडिओ येथे प्रदर्शित करण्यात आले आहे. साधारण १०० फूट व्यासपीठावर नृत्य कलेचे आद्यदैवत नटराजाला नमन करून ‘चित्रपटाची नांदी’ सुरु झाली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या गाण्याला क्षितिज पटवर्धन यांचे बोल मिळाले आहेत तर पंकज पडघन यांनी गाण्याला संगीतबद्ध केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले आहे.
या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, पुष्कर जोग, भरत जाधव, हेमांगी कवी, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.याची पटकथा देखील संजय जाधव यांची असून कथा मनीष कदम यांची आहे. तर संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. तसेच चित्रपटाला अमितराज, पंकज पडघन यांचे संगीत लाभले आहे आणि क्षितिज पटवर्धन यांनी गाणी शब्दबद्ध केली आहेत. या चित्रपटात सुमारे तीस गाणी आहेत. अर्थातच हा चित्रपट एक संगीतमय चित्रपट आहे.
‘तमाशा लाईव्ह’बद्दल बोलताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली कि, “आज इतक्या प्रेक्षकांसमोर ‘चित्रपटाची नांदी’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. पडद्यावर चित्रपट पाहताना जितका सोप्पा वाटतो. तितकाच आव्हानात्मक आणि कठीण तो पडद्यामागे असतो. पडद्यावर कलाकारांचे चेहरे दिसतात. परंतु पडद्यामागच्या कलाकारांची मेहनत कधीच दिसत नाहीत. आज या गाण्याच्या माध्यमातून आम्ही सर्वांचाच सन्मान करत आहोत.” तर दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात कि, “आपल्या मराठी संस्कृतीला लाभलेला भव्य परंपरेचा वारसा जतन करण्याचे काम मराठी सिनेसृष्टी नेहमीच करत आली आहे. याच परंपरेला आधुनिकतेचा साजही वेळोवेळी चढवण्यात आला. आज नितीन देसाई यांच्या स्टुडिओमध्ये एका मोठ्या महोत्सवात ‘चित्रपटाची नांदी’ हे गाणे प्रदर्शित होणे ही आमच्यासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे.’
Discussion about this post