हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टी एकापेक्षा एक अव्वल अशा कलाकृती घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विविध धाटणीच्या कथांवर भाष्य करणारे सिनेमा प्रदर्शित होत आहेत. कुठे चंद्रमुखी चित्रपटाची चर्चा सुरु आहे तर कुठे आगामी धर्मवीर चित्रपटाबाबत उत्सुकता. यातच आता मराठी दिग्दर्शक संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’चा कमाल टीझर प्रदर्शित झाला आहे. हा टिझर नुसता रिलीज झाला नाही तर चांगलाच व्हायरलदेखील झाला आहे. अलीकडेच ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटातील ‘चित्रपटाची नांदी’ या गाण्याने प्रेक्षकांना मोहून टाकल्यानंतर आता अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर त्याचा हटके टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
या टीझरमध्ये सुरुवातीलाच सिद्धार्थ म्हणतो बातमी तर रंगणारच… सोनाली आणि सचितही एकच वाक्य बोलत आहेत, आता कोणत्या दगडाला शेंदूर फासणार? हे नेमकं काय प्रकरण आहे याची काहीही टोटल लागत नाही. पण एकंदरच टीझरवरून असं वाटतंय कि हा चित्रपट तमाशापेक्षा जास्त वृत्त वाहिन्यांशी संबंधित आहे. आता नेमका हा चित्रपट आहे तरी काय हे जाणून घ्यायचे असेल तर येत्या २४ जून २०२२ रोजी मिळणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक ‘तमाशा लाईव्ह’ हे इतकेच खरेतर प्रेक्षकांना उत्सुक करण्यास पुरेसे होते. यात आता जेव्हा पहिले गाणे आणि टिझर रिलीज झालाय तेव्हा कधी एकदा हा चित्रपट रिलीज होतो अशी उत्कंठता निर्माण झाली आहे. या चित्रपटात भरत जाधव, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, पुष्कर जोग, हेमांगी कवी, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आणि आयुषी भावे यांच्या मुख्य भूमिका आहेत.
https://www.instagram.com/p/CdDfHfBsivw/?utm_source=ig_web_copy_link
‘तमाशा लाईव्ह’ या आपल्या आगामी चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले कि, ‘तमाशा लाईव्ह’च्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांना काहीतरी नाविन्यपूर्ण देण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटात अतिशय कसलेले कलाकार आणि तगडी संगीत टीम आहे. हा एक संगीतमय चित्रपट असला तरीही याला आधुनिकतेची जोड लाभली आहे. चित्रीकरणाआधी आमची अडीच महिने कार्यशाळा सुरु होती. कार्यशाळेच्या सुरुवातीलाच या कलाकारांना व्यक्तिरेखेशी एकरूप होणे जरा कठीण जात होते.
त्या व्यक्तिरेखेला १०० टक्के न्याय मिळत नसल्याची भावना कलाकारांकडून व्यक्त होत होती. मात्र अडीच महिन्यांनी हे चित्र पूर्णपणे पालटले. मला आठवते कि, चित्रीकरण संपल्यानंतर एकदा एडिटला बसल्यावर मला सोनालीची एक लाईन सापडत नव्हती आणि ती त्यावेळी एका चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. मी तिला फोन केला आणि अल्पावधीतच तिने मला व्हॉट्सअपवर संपूर्ण सीन रेकॉर्ड करून पाठवला. एवढी ती त्या व्यक्तिरेखेशी एकरूप झाली होती आणि तीच नाही तर चित्रपटातील प्रत्येक कलाकार अडीच महिन्यांनी आपापल्या व्यक्तिरेखेशी जोडले गेले होते.”
Discussion about this post